भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या नेपाळला भारत सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात दिले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
नेपाळच्या मदतीला भारतातून मदत तसेच श्वान पथके पाठवण्यात येत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भूकंपाची हानी काय असते हे आपण २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातमधील कच्छच्या भूकंपात जवळून पाहिल्याचे मोदींनी स्पष्ट केले. कठीण प्रसंगात देशवासीय नेपाळच्या पाठीशी आहेत, तो आमचाच देश आहे, त्यामुळे त्यांचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करू, अशी मोदींनी साद घातली.
बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या वादळाचा उल्लेख मोदींनी केला. तसेच युद्धग्रस्त येमेनमधून कठीण परिस्थितीत भारतीयांची सुखरूप सुटका केल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालय, हवाईदल व नौदलाचे त्यांनी कौतुक केले. जागतिक समुदायानेदेखील भारताचे कौतुक केल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
१९१४-१८ या कालावधीतील पहिल्या महायुद्धात १५ लाख भारतीय सैनिकांनी जिवाची बाजी लावली. त्यामागे एखादा भूभाग ताब्यात घेण्याची नव्हे तर सेवा करण्याची भावना होती असे मोदींनी स्पष्ट केले. यामध्ये ७४ हजार भारतीय जवान शहीद झाले. यातील ९२०० जणांना शौर्यपदके मिळाली त्यात ११ जणांना व्हिक्टोरिया क्रॉस हा त्यावेळचा सर्वोच्च बहुमान मिळाला. या उदाहरणावरून जागतिक शांततेसाठी आम्ही योगदान देऊ शकतो हे सिद्ध झाल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
उपखंडात नैसर्गिक आपत्तींची मालिकाच सुरू आहे. त्यात शनिवारी नेपाळ भूकंपाने हादरले. त्यामुळे मन की बात कार्यक्रमात संवाद साधावा असे वाटत नव्हते. गेल्या महिन्यात बोललो त्यावेळी गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. काही दिवसांपूर्वी बिहारला वादळाने तडाखा दिला. आता नेपाळच्या भूकंपाने जग हेलावून गेले आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान