पीटीआय, कोपनहेगन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत आपण युक्रेनमधील युद्धाबाबत चर्चा केली, तसेच तेथील नागरिकांवर (रशियाने तसेच रशिया समर्थकांनी) केलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या अत्याचारांचा मुद्दाही उपस्थित केला. हे युद्ध थांबविण्यासाठी भारत रशियाला प्रवृत्त करेल, अशी आपल्याला आशा वाटते, अशी स्पष्ट भूमिका डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी मंगळवारी येथे मांडली.
रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केल्यानंतरच्या दोन महिन्यांत युरोपमधील ज्या नेत्यांनी भारताकडे इतक्या स्पष्टपणे अशी अपेक्षा व्यक्त केली, त्यात फ्रेडरिक्सन या एक आहेत. कोणत्याही कारणाविना रशियाने युक्रेनवर केलेल्या या बेकायदा हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना आमचा अत्यंत स्पष्ट संदेश आहे की, त्यांना हे युद्ध थांबवून तेथील नरसंहाराचा अंत करावा लागेल, असे त्यांनी बजावले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत भारताचे पंतप्रधान मोदी होते. या दोघांदरम्यान झालेल्या द्विपक्षीय चर्चेविषयी माहिती देताना मोदी यांनी सांगितले की, आम्ही युक्रेनवर चर्चा केली आहे. युद्धबंदी व्हावी, तसेच रशिया-युक्रेन वादावर संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा निघावा, अशी भारताची भूमिका असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. हीच भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रे आणि सोमवारी बर्लिनमध्येही मांडली होती.
जर्मनीचा दौरा आटोपल्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डेन्मार्क दौऱ्यास सुरुवात झाली. डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांच्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी भारत डेन्मार्कदरम्यानच्या पर्यावरणानुकूल व्यूहात्मक भागीदारीच्या प्रगतीबाबतचा (ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप) आढावा घेतला. त्याच बरोबर जागतिक आणि प्रादेशिक बाबींवरही विचारविनिमय करण्यात आला.
मोदींच्या स्वागतासाठी फ्रेडरिक्सन विमानतळावर उपस्थित होत्या. त्यानंतर डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या मारियाबोर्ग अधिकृत निवासस्थानी मोदींचे स्वागत करण्यात आले. त्यांनी मोदींना आपल्या निवासस्थानाची सफर घडवली. मोदींनी मागील भारत दौऱ्यात फ्रेडरिक्सन यांना ओडिशी पारंपरिक पट्टचित्र कलेतील एक चित्र भेट दिले होते. निवासस्थानी लावलेले हे चित्र फ्रेडरिक्सन यांनी मोदींनी आवर्जून दाखवले.
दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र चर्चा केल्यानंतर शिष्टमंडळांदरम्यानही चर्चा झाली. यामध्ये पवनउर्जेसारखी अपारंपरिक ऊर्जा, हरित हायड्रोजन, कौशल्य विकास, आरोग्य, सागरी व्यापार, पाणीप्रश्न, ‘आक्र्टिक्ट’ची स्थिती यावर चर्चा झाली. डॅनिश कंपन्या भारताच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांत देत असलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान मोदींनी यांनी गौरवोद्गार काढले. फ्रेडरिक्सन यांनी डेन्मार्कमध्ये भारतीय कंपन्या बजावत असलेल्या सकारात्मक भूमिकेचा आवर्जून उल्लेख करत प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी उभय देशांतील नागरिकांतील सौहार्दपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली. दोन्ही देशांदरम्यान स्थलांतर आणि दळणवळण अधिक सुकर होण्यासाठीच्या प्रस्तावित भागीदारीच्या घोषणेचे स्वागत केले. मोदी हे भारत-डेन्मार्क व्यावसायिक गोलमेज परिषदेला उपस्थिती लावणार असून, डेन्मार्कमधील भारतीयांशीही संवाद साधणार आहेत. डेन्मार्कमध्ये सुमारे १६ हजार भारतीय राहतात. सुमारे भारतात २०० हून अधिक डॅनिश कंपन्या ‘मेक इन इंडिया’, ‘जलजीवन मिशन’, ‘डिजिटल इंडिया’सारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमांत सहभागी आहेत. डेन्मार्कमध्ये ६० हून अधिक भारतीय कंपन्या मुख्यत्वे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.