भारताला शेजारील राष्ट्रांसोबत मैत्रिपूर्ण संबंध हवे आहेत. सीमेवर भारताकडून गोळीबाराची सुरूवात केव्हाच होत नाही, असे ठाम मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या रेंजर्स सोबतच्या बैठकीत व्यक्त केले. भारत-पाक सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून सतत गोळीबार होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भारतीय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यादरम्यान महासंचालक स्तरावरील महत्त्वाची बैठक झाली.

उभय राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठक दुर्देवाने होऊ शकली नाही. याचा अर्थ भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध अपेक्षित नाहीत असा अर्थ होत नाही. भारताला पाकिस्तानसोबत मैत्रिपूर्ण संबंध हवे असून हे केवळ औपचारिकता म्हणून केलेले वक्तव्य नाही, असे राजनाथ सिंह बैठकी दरम्यान म्हणाले. सीमेवर भारताकडून पहिली गोळी चालवली जाणार नाही, असे आश्वासन देखील राजनाथ यांनी पाकिस्तानचे डायरेक्टर मेजर जनरल उमर फारुख बुर्की यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्ट मंडळाला दिले. यावर प्रतिक्रिया देताना राजनाथ यांचे म्हणणे पाकिस्तानच्या नेतृत्त्वापर्यंत आम्ही पोहोचवू, असे बुर्की यावेळी म्हणाले. तसेच पाकिस्तानातून भारतीय सीमेत घुसखोरी होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही पाकिस्तानच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बैठकीनंतर पाकिस्तानी रेंजर्सनी सूफी संगीत आणि भारतीय मेजवानीचा आस्वाद घेतला. पाकिस्तानी पाहुण्यांसाठी बीएसएफने एका म्यूझिकल इव्हिनिंगचे आयोजन केले होते. यात प्रसिद्ध गायक हंसराज हंस यांनी पंजाबी लोकगिते सादर केली. सूफी गाण्यांबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचाही आस्वाद पाकिस्तानी सैनिकांनी घेतला.

Story img Loader