भारताला हवा असलेला आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम आपल्या देशात असल्याचे पाकिस्तानच्या एका ज्येष्ठ मुत्सद्दय़ाने मान्य केल्यानंतर भारताने, १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेचे प्रकरण कधीही बंद केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. या अत्यंत घृणास्पद हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना कठोर शासन होईपर्यंत भारत स्वस्थ बसणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पाकिस्तान सरकारच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने केलेले वक्तव्य आमच्याही निदर्शनास आले आहे. मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेचे प्रकरण अद्याप आम्ही बंद केलेले नाही. आता आम्हाला अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बॉम्बस्फोट मालिकेला जबाबदार असलेल्यांना कडक शासन केल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे विश्वासू शहरयार खान यांनी, दाऊद एकेकाळी पाकिस्तानात वास्तव्याला होता, असे म्हटले आहे. दाऊद पाकिस्तानातच होता, असे पाकिस्तानच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने स्पष्ट करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दाऊद पाकिस्तानातच होता, मात्र त्याला आता पाकिस्तानबाहेर पिटाळण्यात आले आहे. जर तो अद्यापही पाकिस्तानातच असता तर त्याला हुडकून अटक करण्यात आली असती. आम्ही अशा गुन्हेगारांना आमच्या देशातून कारवाया करण्याची मुभा देणार नाही, असे शहरयार खान यांनी स्पष्ट केले. दाऊद पाकिस्तानात असता तर आतापर्यंत त्याला अटक झाली असती, असेही ते म्हणाले.
लंडनमधील भारतीय पत्रकारांच्या संघटनेने आयोजित केलेल्या एका समारंभात शहरयार खान यांनी हे वक्तव्य केले. तथापि, दाऊद पाकिस्तानात आहे का त्याबाबत आपण अनभिज्ञ आहोत, असे सांगून शहरयार खान यांनी त्यानंतर घूमजाव केले.
दाऊदच्या पाकमधील वास्तव्याबाबत शहरयार खान यांची कोलांटउडी
मुंबईत १९९३ मध्ये करण्यात आलेले बॉम्बस्फोट व इतर हल्ल्यांच्या प्रकरणात भारताला हवा असलेला कुख्यात अतिरेकी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात होता, अशी कबुली देणारे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव शहरयार खान यांनी आता कोलांटउडी घेतली असून दाऊद पाकिस्तानात होता किंवा नाही याबाबत काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी आज सांगितले. ते म्हणाले की, आपण परराष्ट्र खात्यात होतो तेव्हा व आताही दाऊद इब्राहिम कुठे राहतो हे आपल्याला माहीत नव्हते व नाही. पाकिस्तानी प्रसारमाध्यमातून दाऊदविषयी देण्यात आलेल्या बातम्यांच्या आधारे आपण कालचे वक्तव्य केले होते. कदाचित अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाला दाऊद कुठे आहे याची कल्पना असू शकेल पण परराष्ट्र मंत्रालय व आपल्याला दाऊद कुठे होता व आता कुठे आहे याची कल्पना नाही.पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भारत-पाकिस्तान संबंधविषयक खास खास दूत शहरयार खान यांनी काल असे सांगितले की, दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात होता पण तो आता येथून पळाला आहे. जर तो पाकिस्तानात असता तर आम्ही त्याला हुडकून काढले असते व अटक केली असती. अशा गँगस्टरला आम्ही आमच्या देशातून मुळीच कारवाया करू देणार नाही.
ते म्हणाले की, दाऊद सध्या संयुक्त अरब अमिरातीत असावा. नवाझ शरीफ सरकार पाकिस्तान व तसेच भारत व अफगाणिस्तान यासारख्या शेजारी देशांवर परिणाम करणाऱ्या गुन्हेगारी कारवायात सामील असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करायला नेहमीच तयार आहे. आमच्या देशात आम्ही गुन्हेगारांना आश्रय देऊ शकत नाही. जर ते आमच्या देशात आले तर त्यांच्यावर कारवाई करू. त्यामुळे दाऊद पाकिस्तान सोडून गेला असे आपल्याला वाटते.

Story img Loader