पीटीआय, नवी दिल्ली

भारतात मे महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेदरम्यान नोंदवले गेलेले कमाल तापमान हे आधीच्या उष्णतेच्या लाटांदरम्यान नोंदवण्यात आलेल्या कमाल तापमानांपेक्षा जवळपास १.५ अंश सेल्सियस अधिक होते असे एका अभ्यासात आढळून आले आहे. ‘क्लायमामीटर’ या हवामान शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या स्वतंत्र गटाने यासंबंधी माहिती दिली आहे.

‘क्लायमामीटर’ने दिलेल्या माहितीनुसार, मध्य आणि प्रशांत महासागरामध्ये सागरी पृष्ठभाग तापल्यामुळे उद्भवलेला नैसर्गिक ‘एल निनो’ घटक आणि वातावरणातील हरितगृह वायूंचे, विशेषत: कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांचे वाढलेले प्रमाण यामुळे यंदाची उष्णतेची लाट आतापर्यंतची सर्वाधिक उष्ण ठरली.

भारतामध्ये १९७९ ते २००१ या कालावधीत मे महिन्यातील उष्णतेच्या लाटेदरम्यान उच्च तापमानासारख्या बाबी २००१ ते २०२३ या कालावधीतील मे महिन्यांमध्ये कशा बदलत गेल्या याचे विश्लेषण ‘क्लायमामीटर’च्या संशोधकांनी केले आहे. तापमानांमध्ये झालेले बदल असे दर्शवतात की, देशातील मोठ्या प्रदेशाचा विचार केला असता पूर्वीच्या कालावधीत (१९७९ ते २००१) नोंदवलेल्या तापमानांच्या तुलनेत सध्याच्या तापमानामध्ये किमान १.५ अंश सेल्सियसने वाढ झाली आहे.

हेही वाचा >>>आईने पाण्यातून बाहेर पडण्यास सांगितले, पण…; रशियातील नदीत बुडालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबांवर आघात

‘क्लायमामीटर’च्या अभ्यासातून ही बाब अधोरेखित झाली आहे की भारतातील उष्णतेच्या लाटा आता जीवाष्म इंधन ज्वलनामुळे असह्य तापमानाला पोहोचल्या आहेत असे ‘फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायन्टिफिक रिसर्च’चे संशोधक डेव्हिड फरांदा यांनी सांगितले.

भविष्यातील परिस्थिती अधिक गंभीर?

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे जियान्मार्को मेन्गाल्डो यांनी माहिती दिली की, या संशोधनातून नैसर्गिक परिवर्तनशीलता आणि हवामान बदल यांच्यातील संबंध गुंतागुंतीचे असल्याचे दिसते. यामुळे निकटच्या भविष्यात उष्णतेच्या लाटांची परिस्थिती लक्षणीयरित्या बिघडेल. उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशातील होणाऱ्या गंभीर पर्यावरणीय बदलांमध्ये हवामान बदल महत्त्वाची भूमिका बजावते.

५० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणाऱ्या तापमानासाठी कोणतेही तंत्रज्ञानात्मक उपाय नाहीत. आपण सर्वांनी आता कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशाच्या मोठ्या भागामध्ये मर्यादेपेक्षा जास्त तापमानवाढ टाळण्यासाठी कृती केली पाहिजे.-डेव्हिड फरांदासंशोधक, ‘फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायन्टिफिक रिसर्च’