भारतीय वायुदलातील विमानांची घटती संख्या लक्षात घेता, पाकिस्तान व चीनविरुद्ध एकाच वेळी युद्धाचा प्रसंग आल्यास दोन्ही आघाडय़ांवर हवाई मोहिमेची संपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशी विमाने आमच्याकडे नाहीत, अशी स्पष्ट कबुली वायुदलाने गुरुवारी दिली. ३६ राफाल विमानांव्यतिरिक्त जादा ‘फिफ्थ जनरेशन’ लढाऊ विमाने मिळावीत अशी मागणीही वायुदलाने केली.
वायुदलाची विमानांची मंजूर क्षमता ४२ असताना त्याच्या ताफ्यातील विमानांची संख्या ३३ वर आली आहे. या ३३ पैकी बहुतांश विमाने रशियन बनावटीची एसयू-३० विमाने असून सध्या ती देशाची आघाडीची लढाऊ विमाने आहेत.
तथापि, उपयोगी पडणाऱ्या विमानांचे प्रमाण अतिशय कमी असून ही संख्या ५५ टक्क्यांच्या आसपास आहे. याचा अर्थ १०० विमानांपैकी सुमारे ५५ विमानेच एका वेळी उपलब्ध असतात, तर इतर विमाने दुरुस्तीत अडकलेली असतात.
एकाच वेळी दोन आघाडय़ांवर संपूर्ण क्षमतेने लढण्यासाठी पुरेशी विमानांची संख्या आमच्याकडे नाही. दोन आघाडय़ांच्या परिस्थितीच्या शक्यतेचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी पुरेशी विमाने आहेत काय म्हणाल, तर नाही. आमच्या विमानांच्या तुकडय़ा कमी होत आहेत, असे वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल बी. एस. धनोआ यांनी पत्रकारांना सांगितले. उद्या दोन आघाडय़ांवर एकाच वेळी युद्ध सुरू झाले तर ते लढण्याची वायुदलाची क्षमता आहे काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
मात्र दोन आघाडय़ांवर युद्धाची शक्यता येत्या काही वर्षांमध्ये तरी नसून, दरम्यानच्या काळात वायुदलाकडे आवश्यक ती क्षमता असेल असे वायुदलाच्या सूत्रांनी सांगितले.
आमची चिंता आम्ही सरकारला कळवली आहे. सरकार या समस्येवर विचार करत असून, विमानांची संख्या घटत असल्यामुळे नवी विमाने खरेदी करण्याची तातडी जाणवल्यामुळेच सरकारने ३६ राफाल विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे, असे कारगिल युद्धात भाग घेतलेले धानोआ म्हणाले. या विमानांव्यतिरिक्त आणखी मध्यम बहुउपयोगी लढाऊ विमानांची आवश्यकता आहे काय, या प्रश्नाला त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.

Story img Loader