पीटीआय, बंगळुरू
हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी हलके लढाऊ विमान ‘तेजस’मधून भरारी घेतली. दर दोन वर्षांनी होणारे ‘एअरो इंडिया’ हे हवाई प्रदर्शन बंगळुरू येथे सोमवारपासून सुरू होत असून ते १४ फेब्रुवारीपर्यंत चालेल.
‘आपल्या आयुष्यातील हा सर्वांत चांगला क्षण आहे,’ अशी प्रतिक्रिया लष्करप्रमुखांनी ‘तेजस’मधून उड्डाण केल्यानंतर दिली. लष्करप्रमुखांनी या वेळी एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांना आपले गुरू मानले आणि ‘लष्कराऐवजी मी हवाई दलाची निवड का केली नाही,’ असे ते मिश्किलपणे म्हणाले. जनरल द्विवेदी म्हणाले, ‘एअर चीफ मार्शल माझ्याच बॅचचे असून एनडीएपासून आम्ही बरोबर आहोत. ते मला यापूर्वी भेटायला हवे होते. मी कदाचित हवाई दलाची निवड केली असती. आजपासून ए. पी. सिंग माझे गुरू असतील. ‘तेजस’मधून उड्डाण केल्यानंतर आकाशात त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकविल्या.’
संरक्षणमंत्री उपस्थित राहणार
नवी दिल्ली : ‘एअरो इंडिया’ला संरक्षणमंत्री राजनाथसिंह उपस्थित राहणार आहेत. या ‘एअर शो’मधील भारताच्या विभागाचे ते उद्घाटन करतील. संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावरील अद्यायावत माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. एकूण ४२ हजार चौरस किमी क्षेत्रफळावर भरवण्यात येणारे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे ‘एअरो इंडिया’ प्रदर्शन असेल. यातून नवीन भारताचे सामर्थ्य, लवचिकता आणि स्वावलंबन दिसून येते असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला. हवाई दलाच्या येलाहांका हवाई तळावर भरवले जाणार असून त्यामध्ये १५० परदेशी कंपन्यांसह ९०० कंपन्या सहभागी होत आहेत.
‘एचएएल’ आणि ‘बीईएल’चा सहभाग
‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ देशी बनावटीची उत्पादने प्रदर्शनात ठेवणार आहे. यामध्ये ‘लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर’ आकर्षणाचे केंद्र असेल.याखेरीज ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ ही उत्पादक कंपनीही आपली विविध उत्पादने प्रदर्शनात ठेवणार आहे.