भारतीय वायू दलातील लढाऊ विमान ‘मिराज -२०००’ हे आज सकाळी १०.३० च्या सुमारास मध्य प्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. ग्वाल्हेर इथल्या वायू दलाच्या तळावरुन नियमित सरावाच्या निमित्ताने उड्डाण केल्यावर काही मिनिटातच तांत्रिक बिघाड झाल्याचं मिराजच्या पायलटच्या लक्षात आलं. इजेक्शन सीटच्या सहाय्याने पायलट विमानाच्या बाहेर आला आणि मग पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर सुखरूप उतरला.

या अपघताच्या चौकशीचे तात्काळ आदेश देण्यात आल्याचं भारतीय वायू दलाने स्पष्ट केलं आहे. लढाऊ विमान जमिनीवर कोसळले असले तरी या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिराज -२००० हे लढाऊ विमानांच्या प्रकारातील चौथ्या श्रेणीतले लढाऊ विमान असून भारतीय वायू दलातील एक महत्त्वाचे लढाऊ विमान समजले जाते. पाकिस्तानमध्ये बालाकोट इथे केलेल्या हवाई हल्ल्यात मिराज-२००० लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता.