फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंह अत्याधुनिक हॉक जेट विमान उडवणारी पहिली महिला वैमानिक ठरली आहे. इतर दोन महिला वैमानिकांसह मोहना सिंहची फायटर वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. भावना कंठ आणि अवनी चतुर्वैदी यांच्यासह २०१६ मध्ये मोहना सिंहची लढाऊ वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती.
याआधी फ्लाइट लेफ्टनंट भावना कंठने युद्ध मोहिमेत सहभागी होण्यासाठी पात्र होत पहिली लढाऊ वैमानिक होण्याचा मान मिळवत इतिहास रचला होता. वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी २२ मे रोजी यासंबंधी माहिती देताना सांगितलं होतं की, भावना कंठने लढाऊ विमान मिग-२१ चं उड्डाण करत मिशन पूर्ण केलं होतं.
भारतीय हवाई दलाचे प्रवक्ता ग्रुप कॅप्टन अनुपम बॅनर्जी यांनी सांगितलं होतं की, भावनाने दिवसा लढाऊ विमानाचं उड्डाण करत मिशनमध्ये यश प्राप्त करणारी पहिली महिला लढाऊ वैमानिक ठरली होती.
भावना भारतीय हवाई दलातील पहिल्या बॅचची लढाऊ वैमानिक आहे. त्यांच्यासोबत दोन अन्य महिला वैमानिक अवनी चतुर्वैदी आणि मोहना सिंह यांची २०१६ मध्ये प्लाइंग ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली होती. केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर महिला वैमानिकांनी युद्ध मिशनमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा केला होता.