इंडियन एअर फोर्सच्या ‘जॅग्वार’ फायटर विमानाला शुक्रवारी गुजरातमध्ये भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथील एअर फोर्सच्या तळाजवळ जॅग्वार विमान कोसळले. तीन दिवसात एअर फोर्सचे दुसरे जॅग्वार विमान कोसळले असून एअर फोर्ससाठी हा एक झटका आहे. सुदैवाने या दुर्घटनेतून वैमानिक बचावला.
नियमित उड्डाणाचा सराव करुन जॅग्वार विमान जामनगर एअर बेसवर परतत असताना विमानात तांत्रिक बिघाड उत्पन्न झाला व हे विमान कोसळले. वैमानिक वेळीच बाहेर पडल्याने या अपघातातून बचावले.
या अपघातात वैमानिक जखमी झाले कि, नाही ते समजू शकलेले नाही. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी गुजरातच्या कच्छमध्ये एअर फोर्सचे जॅग्वार विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या घटनेत पायलट संजय चौहान हे शहीद झाले.
अख्ख्या गावाला वाचवून ‘ते’ झाले शहीद
हवाईदलामध्ये एअर कमांडो पदावर कार्यरत असलेले संजय चौहान यांच्या ‘जॅग्वार’ या विमानाने नियमित सरावासाठी जामनगर येथून उड्डाण घेतले होते. मात्र, काही काळातच या विमानाच्या दुर्घटनेची माहिती समोर आले. या अपघातात विमान पायलट संजय चौहान शहीद झाले. या अपघातावेळी संजय चौहान स्वत:चे प्राण वाचवू शकले असते. मात्र, एका नागरी वस्तीवर येणारे संकट टाळण्यासाठी त्यांनी स्वत:चे प्राण पणाला लावले.
जॅग्वार’ ज्यावेळी कोसळत होते त्यावेळी ते एका नागरी वस्तीवर पडणार होते. मात्र, या वस्तीवरील संकट दूर करण्यासाठी संजय चौहान यांनी शेवटपर्यंत विमान नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. खरं तर ते पॅराशूटच्या मदतीने स्वत:चे प्राण वाचवू शकले असते. मात्र, गावक-यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी अखेरपर्यत प्रयत्न केला. ते विमानात तसेच बसून विमान नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत राहिले आणि यातच विमान कोसळून ते शहीद झाले.