Chennai Air Force Show: भारतीय हवाई दलाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त चेन्नईमध्ये एका एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शो दरम्यान डिहायड्रेशनमुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच तब्बल २३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत श्रीनिवासन (४८,रा.पेरुंगलाथूर), कार्तिकेयन (३४) तिरुवोट्टीयुर आणि जॉन (५६) रा.कोरुकुपेट अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या या एअर शोचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात येणार होता. हा शो पाहण्यासाठी या ठिकाणी तब्बल १६ लाख लोकांची गर्दी जमली होती. हा शो सकाळी ११ वाजता सुरु झाला होता. त्यानंतर दोन तास हा शो सुरु होता. मात्र, हा कार्यक्रम पाहण्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासूनच लोक चेन्नईमधील मरीना बीचवर जमले होते.

हेही वाचा : Tensions in Goa: संघाच्या माजी नेत्यामुळं गोव्यात तणाव; ख्रिश्चन समुदायाकडून आंदोलन तर राहुल गांधींची भाजपावर टीका

यावेळी एवढ्या मोठ्या लोकांचं नियोजन योग्य पद्धतीने झाले नाही आणि लाखो लोक गर्दीत अडकले. शहरातील विविध भागात गर्दीमुळे तास लाखो फसले होते. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यामुळे आणि गर्दीत पाणी न मिळाल्यामुळे लोकांना त्रास व्हायला लागला आणि काहींची प्रकृती बिघडली. गर्दीमुळे त्या ठिकाणी असणाऱ्या पाणी विक्रेत्यांना हटवण्यात आले होते. दरम्यान, हा कार्यक्रम संपल्यानंतर घरी परतत असताना लाखो नागरीक एकत्र बाहेर पडल्यामुळे ही घटना घडल्याचंही सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी लाखो लोक जमले होते, त्या ठिकाणी जवळपास पाणी पिण्याची व्यवस्था नसल्यांचही आता सांगितलं जात आहे. त्यामुळे शो संपताच मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडण्यासाठी जमा झाले, यामुळे तेथील वाहतूकही ठप्प झाली होती. लाखो लोकांच्या गर्दीमुळे शहरातील अनेक रस्ते तासंतास ठप्प झाले होते. काही रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचंही सांगण्यात आलं.