भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पहिलं राफेल विमान दाखल झालं आहे. यामुळे भारतीय संरक्षण दलाची ताकद प्रचंड वाढली आहे. दरम्यान मूळचे लातूरचे असणारे भारतीय हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर सौरभ अंबुरे यांना राफेल उडवण्याचा मान मिळाला आहे. जुलै महिन्यात झालेल्या ‘गरुड’ युद्धाभ्यासादरम्यान सौरभ अंबुरे यांनी राफेल विमानातून गगनभरारी घेतली होती.
भारत आणि फ्रान्समधील हवाई दलांमध्ये जुलै महिन्यात ‘गरुड’ युद्धाभ्यास पार पडला. यावेळी सौरभ अंबुरे यांनी सरावादरम्यान राफेल विमानातून उड्डाण केलं होतं. फ्रान्स आणि भारतामधील सैन्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात युद्धाभ्यास आजपर्यंत झालेला नाही. दोन्ही देशांमधील हवाई दलांमधील संबंध सुधारण्यासाठी तसंच सहकार्य वाढण्यासाठी हा युद्धाभ्यास सुरु होता. भारत आणि फ्रान्समधील युद्धाभ्यासादरम्यान राफेल, मिराज-२०००, सुखोई ३० सारखी लढाऊ विमाने पहायला मिळाली.
#ExGaruda2019 : The objective of Indo-France joint exercise is to share good practices & to enhance interoperability & cooperation between the two Air Forces.
During the exchange flying, Sqn Ldr Sourabh Ambure flew in the FAF Rafale aircraft.@Armee_de_lair @FranceinIndia pic.twitter.com/BNg1AzWPPj
— Indian Air Force (@IAF_MCC) July 5, 2019
मोदी सरकारने २०१६ मध्येच ३६ राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. त्यातील पहिलं विमान दसऱ्याच्या मुहूर्तावर भारताकडे सोपवण्यात आलं आहे. यावेळी राजनाथ सिंग यांनी विधीवत पूजा केली. तसंच राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये या विमानातून पहिली भरारी घेतली होती.
राजनाथ सिंग यांनी दसऱ्याच्या दिवशी राफेल विमान ताब्यात घेताना विमानावर ओम चिन्ह रेखाटत नारळ वाढवला होता. तसंच चाकाखाली लिंबूही ठेवले होते. राफेलची पूजा केल्याने राजनाथ सिंग यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली होती. अनेक मिम्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. राजनाथ सिंग यांनी आपली बाजू मांडताना जे योग्य वाटलं तेच केलं असल्याचं म्हटलं होतं. “या विश्वात एक महाशक्ती आहे अशी माझी श्रद्धा आहे. लहानपणापासून माझा या गोष्टींवर विश्वास आहे,” अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंग यांनी दिली.
भारताने फ्रान्सबरोबर केलेल्या करारात एकूण ३६ राफेल विमाने दिली जाणार असून त्यात भारतीय हवाई दलाने सुचवलेल्या १३ सुधारणांचा समावेश आहे. ही विमाने पंजाबमधील अंबाला, पश्चिम बंगालमधील हासिमरा येथील तळांवर तैनात केली जाणार आहेत. हवाई दलाचे उपप्रमुख हरजित सिंग अरोरा यांनी सांगितले की, सीमेवर रक्षणासाठी ही विमाने मोठी भूमिका पार पाडणार आहेत. त्यांची क्षमता पाकिस्तानच्या एफ १६ विमानांच्या दुपटीहून अधिक आहे.