भारतीय वंशाच्या एका व्यक्तीवर अमेरिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय वंशाच्या व्यवस्थापकावर अमेरिकेतील प्रसिद्ध फूटबॉल क्लबला २.२० कोटी डॉलर्सचा (जवळपास १८३ कोटी रुपये) गंडा घातल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने फूटबॉल क्लबला कोट्यवधी डॉलर्सचा गंडा घालून ते पैसे स्वतःसाठी वापरले आहेत. या पैशातून त्याने आलिशान गाड्या आणि महागड्या वस्तू खरेदी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अमित पटेल असं या आरोपीचं नाव असून तो जॅक्सनविले जग्वार्स फूटबॉल क्लब ऑफ अमेरिकाचा आर्थिक व्यवस्थापक होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित पटेल हा २०१८ मध्ये या फूटबॉल क्लबचा आर्थिक व्यवस्थापक म्हणून रुजू झाला आणि त्याने दोन वर्षे या पदावर काम केलं. यंदा फेब्रुवारी महिन्यात क्लबने त्याला नोकरीवरून काढून टाकलं. तसेच त्याच्याविरोधात जॅक्सनविले जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली. पटेलविरोधात दाखल केलेल्या दस्तावेजांनुसार अमित पटेलवर आरोप आहे की त्याने क्लबच्या पैशांचा स्वतःसाठी वापर केला आहे. पटेल हा क्लबचा एकमेव प्रशासक होता. या पदावर असताना त्याने संघातील खेळाडूंसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हर्च्युअल क्रेडिट कार्डचा वापर त्याच्या खासगी खरेदीसाठी केला.

अमित पटेल याने क्लबच्या पैशाने टेस्ला मॉडेल ३ सेडान कार, निसान पिकअप ट्रक, ९५ हजार डॉलर्स इतकी किंमत असलेलं लग्झरी घड्याळ आणि गुंतवणुकीसाठी क्रिप्टोकरन्सी खरेदी केली होती. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास एफबीआयकडे सोपवला आहे.

हे ही वाचा >> “पैशांनी भरलेली कपाटं, दोन दिवसांपासून मोजणी सुरू”, पंतप्रधान मोदी म्हणाले, “नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहून…”

जुगारामुळे क्लबची फसवणूक

दरम्यान, आरोपी अमित पटेलचे वकील अ‍ॅलेक्स किंग म्हणाले, माझ्या आशिलाला त्याच्या कृत्याची लाज वाटतेय आणि त्याला याप्रकरणी माफी मागायची आहे. पटेल याला जुगाराचं व्यसन आहे. या व्यसनामुळेच त्याने फूटबॉल क्लबची फसवणूक केली. फूटबॉल क्लबचे पैसे त्याने जुगारात गमावले आहेत.