अमेरिकेतील वर्णद्वेष गेल्या काही दिवसांत वाढला असल्याचं सातत्याने समोर येत आहे. आता या वर्णद्वेषाला भारतीय वंशाचे धोरण तज्ज्ञ तरल पटेल यांनाही सामना करावा लागला आहे. यासंदर्भात त्यांनी त्यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं असून त्यामध्ये त्यांनी वर्णद्वेष होत असल्याचं स्पष्ट केलं आहे

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील फोर्ट बेंड काऊंटीच्या आयुक्तपदासाठी तरल पटेल हे २९ वर्षीय युवक मैदानात आहेत. यामुळे भारतीयांकडून त्यांचं अभिनंदन होत असताना अमेरिकेत मात्र त्यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांना वर्णद्वेषाचे संदेश मिळत असल्याचं त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

तरल पटेल हे परदेशी नागरीक असून ते स्वातंत्र्य आणि बंदुका हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे संदेश तरल पटेल यांना सोशल मीडियावर प्राप्त होत आहेत.

“काऊंटी कमिशनरसाठी तुमचा डेमोक्रॅटिक उमेदवार या नात्याने, मी नेहमीच माझ्या धोरणात्मक स्थितीवरील टीकेस तयार असतो. परंतु, माझ्या विरोधकांचे समर्थक माझ्या कुटुंबाला, समुदायाला, सहकाऱ्यांना लक्ष्य करून वर्णद्वेष करतात. यामुळे ते त्यांची मर्यादा ओलांडत आहेत”, असं पटेल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षावरही टीका केली. स्थलांतरितांमुळे स्थानिकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती लोकांमध्ये निर्माण केली असून ते आमच्या समुदायाच्या भावना दुखावत आहेत, असंही तरल पटेल यांनी प्रसिद्धी पत्रकांत म्हटलं आहे.

“कोविड काळात आम्ही फोर्ट बेंडच्या प्रत्येक कोपऱ्यात आमचे लस केंद्रे आणि दवाखाने सुरू केली होती. हिवाळी वादळाच्या वेळी तापमानवाढ केंद्रे उभारणे असो, पूर आल्यावर आपत्कालीन प्रतिसादात समन्वय साधणे असो किंवा बरेच काही असो, मी माझ्या जबाबदाऱ्या अत्यंत गांभीर्याने पार पाडल्या आहेत”, असंही ते पुढे म्हणाले.

पटेल यांचा जन्म अमेरिकेत झाला आणि ते स्थानिक शाळांमध्ये गेले. त्यांनी यापूर्वी फोर्ट बेंड काउंटीसाठी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले आहे.

Story img Loader