नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अमेरिकी गायिका आणि नवउद्यमी चंद्रिका टंडन यांनी रविवारी पार पडलेल्या ६७व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम अल्बमसाठी मिळणाऱ्या पुरस्कारावर नाव कोरले. लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्यांच्या ‘त्रिवेणी’ला ‘न्यू एज, अॅम्बियंट किंवा चॅन्ट’ श्रेणीत सर्वोत्तम अल्बमचा पुरस्कार मिळाला.

टंडन यांनी पुरस्कार जिंकल्यानंतर ‘इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमावर पोस्ट लिहून श्रेणीत नामांकन मिळालेल्या इतर सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले, आपल्या संपूर्ण पथकाची प्रशंसा केली, तसेच चाहत्यांचे आभार मानले. ‘त्रिवेणी’ या अल्बमाठी टंडन यांच्याबरोबर दक्षिण आफ्रिकेचे बासरीवादक वाउटर केलरमन आणि जपानी सेलोवादक एरु मात्सुमोटो यांनीही कला सादर केली आहे.

चंद्रिका टंडन या जागतिक पातळीवरील व्यवसाय अधिकारी असून पेप्सिकोच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी या त्यांची धाकटी बहीण आहेत. त्यांना यापूर्वी २००९मध्ये सोल कॉलसाठी नामांकन मिळाले होते. या वर्षी त्यांना पहिल्यांदा पुरस्कार मिळाला.

आमच्या एकत्रित अल्बम ‘त्रिवेणी’ला ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यामुळे आमचा सन्मान झाला आहे. संगीत हे प्रेम आहे, संगीतामुळे आपणा सर्वांच्या आत प्रकाश प्रज्वलित होतो आणि अगदी वाईट दिवसांमध्येही संगीताने आनंद आणि हसू पसरते. चंद्रिका टंडन, गायिका

झाकीर हुसेन यांचे विस्मरण

या सोहळ्यामध्ये श्रद्धांजली वाहण्याच्या यादीमध्ये दिवंगत तबलावादक झाकीर हुसेन यांचे नाव नसल्यामुळे भारतीय चाहत्यांना धक्का बसला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रॅमी पुरस्काराचे वितरण करणाऱ्या रेकॉर्डिंग ॲकॅडमीच्या संकेतस्थळावर मात्र त्यांचा उल्लेख आहे. झाकीर यांना चार वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. त्यांचे १५ डिसेंबरला निधन झाले.

Story img Loader