अमेरिकी आयकर अधिकाऱ्यांची फसवणूक करून ७.९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स भारत आणि स्वित्र्झलडच्या गुप्त बँक खात्यात दडवून ठेवले असल्याची कबुली भारतीय-अमेरिकी उद्योजकाने दिली आहे. आपली संपत्ती उघड न केल्याबद्दल २.४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा दंड भरण्याची तयारीही या उद्योजकाने दर्शविली आहे.
न्यू जर्सी येथील संजय सेठी (५२) या उद्योजकाने मंगळवारी न्यू आर्क फेडरल कोर्टातील जिल्हा न्यायाधीशांसमोर आपला कबुलीजबाब नोंदविला. सेठी याने ‘इंटरनल रेव्हेन्यू सव्‍‌र्हिसेस’मधील अघोषित बँक खात्यामध्ये आपली संपत्ती दडवून ठेवली असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आपली मालमत्ता दडवून ठेवण्यासाठी जे कोणी परदेशांमधील बँक खात्यांचा वापर करीत असतात, त्यांचे अशा प्रकारचे वर्तन आमच्या फौजदारी कायद्यान्वये कदापि मान्य होण्याजोगे नाही. अशा प्रकारे सरकारची फसवणूक झाल्यास प्रामाणिक करदात्यांना कमालीचे दु:ख होते, असे अमेरिकेचे अ‍ॅटर्नी पॉल फिशमन यांनी नमूद केले.
सेठी यास या प्रकरणी जास्तीतजास्त पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. याखेरीज अडीच लाख अमेरिकी डॉलर्सचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणी सेठी याने सत्य आणि अचूक कर विवरणपत्र सादर करण्याची तयारी दर्शविली असून सर्व कर आणि दंडाखेरीज २.४ अमेरिकी दशलक्ष डॉलर्सचा अतिरिक्त दंड भरण्याचीही तयारी दर्शविली आहे. इंग्लंडमध्ये मुख्यालय आणि हाँगकाँग, सिंगापूर, भारत आणि अमेरिकेत कार्यालये असलेल्या आंतरराष्ट्रीय बँकेत सेठी याने गुप्त खाती उघडली होती, असे संबंधित यंत्रणांना समजले आहे. या माहितीत बँकेचे नाव उघड करण्यात आले नसले तरी प्रसारमाध्यमांच्या मते ही बँक ‘एचएसबीसी’ बँक आहे.