अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हेच या पदासाठी योग्य असल्याचे मत व्यक्त करून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका समूहाने त्यांच्या प्रचारासाठी एक राजकीय कृती समिती स्थापन केली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांचा सर्वाधिक लाभ आपल्या समाजाला होणार असल्याचे मतही समूहाने व्यक्त केले आहे.
निवडणूक आयोगाकडे ‘इडियन-अमेरिकन फॉर ट्रम्प २०१६’ची नोंदणी राजकीय कृती समिती म्हणून करण्यात आली आहे. अमेरिकेचे पुढील अध्यक्ष ट्रम्प हेच व्हावेत यासाठी अमेरिकेतील भारतीय वंशाचा पाठिंबा मिळविण्याचा या गटाचा उद्देश आहे.
अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणे, जागतिक पातळीवर अमेरिकेला योग्य पद्धतीने आणणे, दहशतवादाचा नि:पात करणे हे ट्रम्प यांचे कार्यक्रम उत्तम आहेत असे या समूहाला वाटत आहे. त्यामुळे ट्रम्प यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन या समूहाने केले आहे. सेटन हॉल विद्यापीठातील प्राध्यापक ए. डी. अमर हे या समूहाचे अध्यक्ष आहेत, तर न्यूयॉर्कमधील अॅटर्नी आनंद अहुजा हे उपाध्यक्ष आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांचा अधिक लाभ अमेरिकेतील भारतीय वंशाच्या समुदायाला होणार आहे. ट्रम्प हेच रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार असतील आणि तेच अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असतील, असे अमर म्हणाले.