चुरशीच्या लढतीत प्रतिनिधी गृहावर निवड
डॉ. अमी बेरा (४५) यांनी अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सदस्यत्वासाठीची निवडणूक जिंकून बुधवारी इतिहास घडविला. ते या सभागृहात जाणारे तिसरे अमेरिकी भारतीय ठरले आहेत. त्यांचा विजय येथील भारतीयांना सुखावणारा ठरला. या लढतीत असणारे इतर पाच अमेरिकी भारतीय पराभूत झाले आहेत. डॉ. बेरा यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सेव्हन्थ काँग्रेसशनल डिस्ट्रिक्ट मतदारसंघातून डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. त्यांनी चुरशीच्या लढतीत रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान सदस्य डॅन लुंग्रेन यांचा अवघ्या १८४ मतांनी पराभव केला. बेरा यांना ५०.१ टक्के(८८४०६ मते), तर लुंग्रेन यांना ४९.९ टक्के (८८२२२ मते) मतदारांनी पाठिंबा दिला.
आतापर्यंत फक्त दोन भारतीय वांशिक अमेरिकी प्रतिनिधीगृहावर निवडून गेले आहेत. दलिपसिंग सौंड हे १९५० मध्ये विजयी झाले होते, तर बॉबी जिंदाल हे २००५ ते २००८ या काळात प्रतिनिधीगृहाचे सदस्य होते. नंतर त्यांची लुइझिआना राज्याच्या गव्हर्नरपदी निवड झाली. बेरा यांचे आईवडील पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यांच्या विजयासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी त्यांच्यासाठी दोनदा प्रचार दौरा केला. कॅलिफोर्नियातील आणखी एका लढतीत तरणेबांड रिकी गिल (२५) सुमारे १० हजार मतांनी पराभूत झाले. त्यांना डेमॉक्रॅट जेरी मॅकनेरी यांच्या विरोधात फक्त सात टक्के मते पडली. डॉ. सैद ताज, डॉ.मनान त्रिवेदी, उपेंद्र चिवूकुला आणि जॅक उप्पल हे चार अमेरिकी भारतीय उमेदवार लढतीत पराभूत झाले. यातील गिल वगळता इतर पाच जण डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे रिंगणात उतरले होते.    

Story img Loader