पठाणकोट हल्ल्यानंतर दोन महिन्यांनी शोध
पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याला दोन महिने उलटल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या शोधमोहिमेत आर एस पुरा क्षेत्रात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेलगत छुपा बोगदा सापडला आहे. या बोगद्यावाटे सीमेपलीकडून देशात घुसखोरीचा कट असावा, असा संशय आहे. अमरनाथ यात्रा जवळ आली असतानाच हा बोगदा आढळल्याने मोठा घातपाताचा कट उधळला गेल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या अल्ला माई दा कोठी या चौकीजवळच्या परिसरात हा बोगदा पोहोचला आहे. तो जमिनीखाली दहा फुटांवर असून ते तीन गुणिले चार व्यासाचा आहे. पाकिस्तानच्या भूभागातून हा बोगदा सुरू होत आहे. अर्थात भारताच्या हद्दीत ३० मीटपर्यंत तो आला असला तरी तारांच्या कुंपणापलीकडे तो उघडला मात्र गेलेला नाही. त्यामुळे तो अपूर्णावस्थेत आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या जम्मू आणि काश्मीर विभागाचे महानिरीक्षक आर. के. शर्मा यांनी दिली. या बोगद्यावाटे अतिरेकी तसेच शस्त्रास्त्रांचीही तस्करी करण्याचा कट असावा, असे ते म्हणाले.
या परिसरातील जमीन पोकळ असल्याचा संशय आल्यानंतर खोदकाम केल्यावर हा बोगदा आढळला. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत तात्काळ झालेल्या ध्वजबैठकीत हा मुद्दा मांडला गेला असून भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
२०१२पासून बोगदा उघडकीस येण्याची ही चौथी घटना आहे. २०१२मध्ये आणि २०१४मध्ये अखनूर क्षेत्रात प्रत्येकी दोन तर २०१३मध्ये साम्बा क्षेत्रात एक बोगदा उघडकीस आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army detects secret tunnel from pakistan to india