एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली
चीनबरोबर झालेल्या संघर्षांमुळे चर्चेत असलेल्या पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी तिरंगा फडकावून नववर्षांचे स्वागत केले. भारताचे ३० जवान तेथे राष्ट्रध्वज फडकावित असल्याचे छायाचित्र मंगळवारी संरक्षण विभागाशी संबंधित सूत्रांकडून माध्यमांना उपलब्ध झाले. केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजीजू यांनीही हे छायाचित्र ट्वीट केले. गलवान खोऱ्यानजीकच्या भागातून चीनचे सैनिक त्यांच्या देशवासीयांना नववर्षांच्या शुभेच्छा देत असल्याची छायाचित्रे तीन दिवसांपूर्वी चीनच्या प्रसिद्धी माध्यमांत प्रसिद्ध करण्यात आली होती. भारतीय जवानांच्या अन्य छायाचित्रांत हे जवान तात्पुरत्या चौकीजवळील ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावत असल्याचेही दिसत आहेत. ही छायाचित्रे गलवान खोऱ्यात १ जानेवारी २०२२ रोजी टिपलेली आहेत. याच दिवशी उभय बाजूच्या सैनिकांनी लडाख आणि उत्तर सिक्कीमसह प्रत्यक्ष ताबा रेषेवरील १० नाक्यांवर परस्परांना मिठाईचे वाटप केले होते. मात्र, चिनी प्रसारमाध्यमांनी त्यांचे सैनिक गलवान खोऱ्यानजीक त्यांच्या बाजूकडे त्यांचा ध्वज फडकावित असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. १५ जूनच्या संघर्षांनंतर दोन्ही बाजूने निश्चित केलेल्या तटस्थता क्षेत्रापासून हा भाग तसा नजीक नाही.