पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील कोटली कला गावातील १९ वर्षीय अमृतपाल सिंग अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय लष्करात दाखल झाले होते. ते जम्मू काश्मीरच्या राजौरी येथे तैनात होते. परंतु, ११ ऑक्टोबर रोजी त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, अमृतपाल सिग यांचं पार्थिव शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) रोजी त्यांच्या गावी आणण्यात आलं. परंतु, यावरून आता विरोधकांनी अग्निवीर योजनेवरू टीका केली आहे. अग्निवीर योजनेतून दाखल होणाऱ्या जवानांना पूर्वीसारख्या सुविधा आणि सन्मान मिळत नसल्याचा दावा करण्यात येतोय. कारण, अमृतपाल सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. तसंच, त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला नाही. याबाबत भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिलं आहे.
“अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या आकस्मात मृत्यूविषयी चुकीची माहिती आणि चुकीचे वर्णन केले जात आहे. ११ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला तर, १४ ऑक्टोबर रोजी व्हाईट नाईट पोलिसांनी त्यांच्या मृत्यूबाबत यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे”, अशी पोस्ट भारतीय लष्कराने X या मायक्रो ब्लॉगिंग समाज माध्यमावर केली आहे.
भारतीय लष्कराने X मध्ये म्हटलंय की, “अमृतपाल सिंग यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबियांचं आणि भारतीय लष्कराचं अतोनात नुकसान झालं आहे. भारतीय लष्कराच्या नियमानुसार, वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर लष्कराच्या बंदोबस्तात पार्थिव अमृतपाल सिंग यांच्या घरी नेण्यात आले.”
“अग्निपथ योजना सुरू झाल्यानंतर रुजू झालेले आणि अग्निपथ योजना सुरू होण्याआधी रुजू झालेल्या सैनिकांमध्ये भारतीय लष्कर भेदभाव करत नाही. या दोघांनाही समान सुविधा आणि सन्मान दिला जातो”, असं स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिलं.
“१९६७ च्या लष्करी आदेशानुसार, आत्महत्या केलेल्या भारतीय जवानांच्या पार्थिवाववर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करता येत नाही. २००१ पासून १०० ते १४० जवानांनी आत्महत्या केलेल्या आहेत. परंतु, त्यांच्यांवरही शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. अंत्यसंस्कारासाठी तत्काळ आर्थिक मदत, पात्रतेनुसारआर्थिक सहाय्य केलं जातं”, असंही यावेळी सांगण्यात आलं.
“भारतीय जवानांच्या मृत्यूमुळे भारतीय लष्काराला मोठा फटका बसतो. अशाकाळात कुटुंबाच्या दुःखद क्षणी त्यांच्यासोबत सहानुभूती व्यक्त करताना त्यांचा आदर आणि प्रतिष्ठा राखणे हे समाजाचे कर्तव्य आहे. धोरणे आणि शिष्टाचाराचा पालन करण्यासाठी भारतीय लष्कर ओळखले जाते, ती ओळख यापुढेही जपली जाईल”, अशी पोस्ट भारतीय लष्कराकडून करण्यात आली आहे.