वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे तीन सैनिक मारत मंगळवारी तीन जवानांच्या हौताम्याचा बदला घेतला आहे. याशिवाय भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराच्या एका बड्या अधिकाऱ्याचादेखील खात्मा केला आहे. मंगळवारी पाकिस्तानने भारताच्या एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली होती. पाकिस्तानच्या या दृष्कृत्याचा हिशोब भारताने दुसऱ्याच दिवशी चुकता केला आहे.
मंगळवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या तीन सैनिकांना वीरमरण आले होते. यातील एका जवानाचा मृतदेह अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे भारतीय सैन्यात संतापाची लाट होती. माछिल सेक्टरमध्ये या घटनेच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यानंतर भारतीय सैन्याने आक्रमकपणे पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले.
भारताच्या गोळीबारात पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झालेत. याशिवाय पाकिस्तानी लष्करातील कॅप्टन दर्जाचा अधिकाऱ्याचादेखील भारतीय सैन्याच्या गोळीबारात खात्मा झाला आहे. मंगळवारी तीन भारतीय जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झाले होते. पाकिस्तानच्या या कारवाईचा बदला भारतीय सैन्याने अवघ्या २४ तासांमध्ये घेत पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या तीन जवानांना टिपण्याआधी भारतीय सैन्याच्या गोळीबारात बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्याने केला. काश्मीरमधील वादग्रस्त भागात असणाऱ्या गावांवर आणि एका प्रवासी बसवर भारतीय सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. भारताच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११ वर पोहोचल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्याने केला आहे.
‘भारतीय सैन्याने बुधवारी जोरदार गोळीबार केला. निलम खोऱ्यातून जाणाऱ्या एका प्रवासी बसवरदेखील भारतीय सैन्याकडून गोळीबार करण्यात आला,’ अशी माहिती वाहिद खान या अधिकाऱ्याने दिली आहे.
‘पाकव्याप्त काश्मीरमधील घरांवर भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारामुळे दोन स्थानिकांचा मृत्यू झाला आहे’, अशी माहिती पोलीस अधिकारी वसीम खान यांनी दिली आहे. तर भारतीय लष्कराचे प्रवक्ते नितीन जोशी यांनी भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला प्रत्युत्तर दिले जात असल्याचे सांगितले.
पाकिस्तानने बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. जम्मू काश्मीरमधील भारतीय चौक्या पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आल्या. पाकिस्तानच्या गोळीबारात मंगळवारी भारताचे तीन जवान शहीद झाले होते. यातील एका जवानाच्या मृतदेहाची पाकिस्तानी सैन्याकडून विटंबना करण्यात आली होती. पाकिस्तानच्या या कृत्याचा बदला भारताने दुसऱ्याच दिवशी घेत पाकिस्तानला योग्य तो इशारा दिला आहे.