भारत-पाकिस्तान सीमाभागात सातत्याने ड्रोन हल्ले करण्यात येतात. तसेच, ड्रोनचा वापर करुन ड्रग्स, बंदूका आणि पैसे पाकिस्तानमधून भारतात येत असल्याची अनेक प्रकरणे नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता हे ड्रोनची शिकार करण्यासाठी भारतीय लष्कराकडून पक्षाचा वापर करण्यात येणार आहे. हा पक्षी म्हणजे घार आहे.
उत्तराखंड येथील औलीमध्ये भारत आणि अमेरिकेच्या लष्करात संयुक्त प्रशिक्षण अभ्यास सुरु आहे. यावेळी शत्रूचे ड्रोन ठिकाण ओळखणे आणि ते नष्ट करण्यासाठी घार आणि कुत्र्याचा वापर करण्यात येत असल्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. यातील घारीचे नाव ‘अर्जुन’ आहे. ही घार हवेतच ड्रोनची शिकार करून नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. तर, कुत्रा ड्रोनचा आवाज ऐकून भारतीय लष्कराला सतर्क करण्याचे काम करणार आहे.
ड्रोनचे हल्ले रोखण्यासाठी पहिल्यांदाच भारतीय लष्कराकडून पक्षाचा वापर करण्यात येत आहे. यामुळे जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या सीमेवर पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रग्ज, बंदूका आणि पैशांवर रोख लावता येणार आहे. दरम्यान, २४ नोव्हेंबरला जम्मू-काश्मीर पोलिसांनी पैसे आणि शस्त्रे घेऊन येणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनवर कारवाई करत जप्त करण्यात आलं होतं.