जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात सलग सहाव्या दिवशीही दहशतवाद्यांसोबत चकमक सुरूच आहे. त्यामुळे याकडे भारतातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या चकमकींपैकी एक चकमक म्हणून पाहिलं जातंय. या सैन्य मोहिमेत भारतीय सुरक्षा दलाचा एक कनिष्ठ अधिकारी आणि एक जवानही बेपत्ता झालेत. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी सैन्यानं विशेष कोंबिंग ऑपरेशन सुरू केलंय.
सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता सैन्य अधिकाऱ्यासोबत गुरुवारपासून (१४ ऑक्टोबर) संपर्क तुटला आहे. हा अधिकारी आणि एक जवान दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत गंभीर जखमी झालेत. त्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू आहे. रात्रीच्या वेळी जंगलात शोध घेणं कठिण असल्यानं ही मोहीम पुन्हा रविवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी सुरू केली जाणार आहे.
दहशतवाद्यांकडून सैन्यावर मोठ्या प्रमाणात गोळीबार
दहशतवाद्यांनी 14 ऑक्टोबरला सायंकाळी सैन्यावर जोरदार गोळीबार केला. यात रायफलमॅन योगंबर सिंह आणि विक्रमसिंह नेगी हे दोन जवान शहीद झाले. जंगलाच्या खूप आतमध्ये झालेल्या या चकमकीनंतर शहीद जवानांचे मृतदेह आणणं हेही सैन्यासमोर आव्हान ठरलं. त्याआधी याच भागातील चकमकीत ५ जवान शहीद झाले होते.
हेही वाचा : JK Poonch Encounter: जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद
नेमकं काय घडलं?
भारतीय सुरक्षा दलाला पुंछमधील सुरनकोटच्या डेरा की गली गावात काही दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर सुरक्षा दलाने या भागाला घेराव घालत शोध मोहिम सुरू केली. याच दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. यात ४ जवानांसह एक कनिष्ठ अधिकारी जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर १४ ऑक्टोबरला पुन्हा २ जवान शहीद झालेत. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
चरमेरमध्येही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून चरमेरच्या जंगलात लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चकमकीनंतर आता या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आलंय. दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून पूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आलीय. जंगलात ४-५ दहशतवादी मोठ्या शस्त्रसाठ्यासह असल्याचा अंदाज आहे.