भारतीय सैन्याच्या ३३ पानी अहवालातून पाकिस्तानच्या कुरापतींविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तानकडून भारतात अशांतता पसरवण्यासाठी आखण्यात आलेल्या अनेक दहशतवादी कटांबाबत यात माहिती देण्यात आली आहे. यात सीमेवर घुसखोरी करणे, जम्मू काश्मीरमध्ये हत्याकांड करणे, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक समुदायावर अत्याचार करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
सैन्याच्या या अहवालात जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांकडून होणाऱ्या पोलीस, शिक्षक, स्थलांतरीत कामगार यांच्या हत्यांबाबतही माहिती देण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून काश्मीरमधील राजकीय नेत्यांची हत्या करून तरुणांची माथी भडकावली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सीमेवर भारतात घुसखोरीचे प्रयत्न
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांकडून वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातो. २०२०-२१ मध्ये सीमाभागात घुसखोरीचे एकूण १६ प्रयत्न झाले. दरवेळी दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरील वेगवेगळ्या ठिकाणाहून घुसखोरीचा प्रयत्न केला. यावर सैन्याने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कारवायांमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नानही घालण्यात आले.
दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांची भरती
या अहवालात कशाप्रकारे दहशतवादी जम्मू काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावून, आर्थिक अडचण असलेल्या तरुणांना पैसे देऊन दहशतवादी संघटनांमध्ये भरती करत आहेत याचीही माहिती देण्यात आली. तरुणांना चिथावणी देऊन त्यांना कथिक जिहादसाठी भडकावलं जातं.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सामान्य नागरिकही
अहवालात दहशतवाद्यांकडून ठराविक नागरिकांना कशाप्रकारे लक्ष्य केलं जातं याबाबतही माहिती देण्यात आलीय. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी हत्याकांड केले.
हेही वाचा : विश्लेषण : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा कट आखणाऱ्याला पाकिस्तानमध्ये अटक? वाचा कोण आहे साजिद मीर…
गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ५ ऑगस्ट २०१९ ला कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर आतापर्यंत जम्मू काश्मीरमध्ये एकूण ८७ नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मागील ५ वर्षात या हत्यांची संख्या १७७ इतकी आहे. याशिवाय मागील ३ वर्षात विविध राजकीय पक्षांशी संबंधित एकूण २७ जणांच्या हत्या झाल्या आहेत.