तुफान बर्फवृष्टीमुळे सिक्कीमच्या उत्तरेकडे अडकून पडलेल्या १५० पर्यटकांची भारतीय लष्कराने सुटका केली आहे. या पर्यटकांमध्ये ११ मुले आणि ३४ महिलांचा समावेश आहे. बुधावारी झालेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे हे पर्यटक लाचुंग घाटात अडकले होते.
लाचुंग घाटामध्ये १५० पर्यटक अडकून पडल्याची माहिती सिक्कीममधील त्रिशक्ती कॉर्प्सच्या मुख्यालयास मिळाली. त्यानंतर तातडीने जवानांनी मदतकार्याला सुरुवात केली. लाचुंग घाटामध्ये तुफान बर्फवृष्टी होत होती. तरीही जीवाची पर्वा न करता जवानांनी पर्यटकांना घाटातून बाहेर काढले. या मदतकार्यानंतर जवानांवर कौतुकाचा वर्षांव होत आहे. बाहेर काढण्यात आलेल्या पर्यटकांना ठेवण्यासाठी सुरक्षित ठिकाण नव्हते, त्यामुळे जवानांनी त्यांना आपल्या बराकीमध्येच ठेवले. पर्यटकांच्या खाण्यासाठी जवान स्वत: अर्धपोटी राहिले आणि त्यांना जेवण दिले.
बचावादरम्यान एका महिलेचा अस्थिभंग झाला तेव्हा तिच्यावर प्रथमोपचारही जवानांनी केले. काही पर्यटकांना थंडीताप भरला होता तर काही जणांना चक्कर येत होती. त्यांना औषधेही देण्यात आली. सर्व पर्यटकांची अवघ्या चार तासांमध्ये सुटका करण्यात आली. हे पर्यटक ४३ वाहनांमधून गेले होते त्यापैकी २३ वाहने मिळाली आहेत.