काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुट्टीवर घरी येणाऱ्या एका जवानाचे अपहरण केले आहे. पूँछ येथे राहणाऱ्या या जवानाचे पुलवामामधून अपहरण करण्यात आले आहे. औरंगजेब असे या जवानाचे नाव असून तो ४४ राष्ट्रीय रायफल्समध्ये आहे. काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात हा जवान तैनात होता. समीर टायगरच्या चकमकीत औरंगजेब सहभागी होता. या जवानाला शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
अपहरण झालेला जवान पूँछ येथे राहणारा असून त्याने सुट्टी घेतली होती. तो गाडीने घरी परतत असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. ईदच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात कारवाई थांबवली आहे. याच काळात काश्मीरमध्ये मोठया प्रमाणात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत असे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
मागच्यावर्षी मे महिन्यात दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये उमर फय्याझ या निशस्त्र लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण करुन त्याची हत्या केली होती. दुसऱ्या दिवशी या अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला होता. उमर फय्याझ विवाहसोहळयासाठी चाललेला असताना त्याचे अपहरण झाले होते.