सुट्टीसाठी घरी आलेला भारतीय लष्कराचा जवान बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून संबंधित जवानाचं त्याच्याच वाहनातून अपहरण करण्यात आलं आहे, असा दावा जवानाच्या कुटुंबीयांनी केला. जावेद अहमद वानी असं बेपत्ता झालेल्या भारतीय जवानाचं नाव असून ते कुलगाम जिल्ह्यातील अचथल भागातील रहिवासी आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, जावेद अहमद वानी हे लेह (लडाख) येथे तैनात होते. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ते बेपत्ता झाले. त्यानंतर जावेद वानी यांची कार पारनहॉल परिसरात सापडली. अपहरण झालेल्या जवानाचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
याप्रकरणी काश्मीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काही संशयित आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. घटनेच्या दिवशी जावेद हे आपली कार घेऊन किराणा सामान खरेदी करण्यासाठी चोवलगाम येथे गेले होते. त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले.
जावेद घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला. यावेळी पारनहॉल परिसरात जावेद यांची कार आढळून आली. या कारमध्ये जवानाची चप्पल आणि रक्ताचे डाग आढळून आले आहेत. तसेच कार अनलॉक अवस्थेत होती. त्यामुळे जवानाचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं असावं, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.