CEO of AI Startup Killed 4 Year Old Child: बंगळुरूस्थित एका AI स्टार्टअपच्या ३९ वर्षीय सीईओला सोमवारी रात्री तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. इंडियन एक्सस्प्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सुचना सेठ हिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून तिच्या मुलाचा मृतदेह पिशवीत भरून टॅक्सीमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येमागचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी, प्राथमिक चौकशीत आरोपी महिलेने तिच्या पतीसह बिघडलेले संबंध हे एक कारण नमूद केले होते. महिलेने शनिवारी उत्तर गोव्यातील कँडोलिम येथील एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये आपल्या मुलासह चेक-इन केले होते आणि सोमवारी सकाळी चेक आउट केले.
कसा झाला खुनाचा उलगडा?
एका अधिकाऱ्याने सांगितले की, हाऊस-कीपिंग कर्मचार्यांपैकी एक जण सोमवारी अपार्टमेंट स्वच्छ करण्यासाठी गेला असताना त्याला काही रक्ताचे डाग दिसले. हॉटेल व्यवस्थापनाने गोवा पोलिसांशी संपर्क साधला आणि कलंगुट पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासकर्त्यांनी सांगितले की,
“सीसीटीव्ही फुटेज तपासताना असे दिसून आले की आरोपी येताना तर तिच्या मुलाबरोबर आली होती पण जाताना ती एकटीच होती. हॉटेलमधून बाहेर पडताना तिच्या हातात एक मोठी बॅग होती. तपासादरम्यान, हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, महिलेने रिसेप्शनिस्टला बंगळुरूला जाण्यासाठी कॅबची व्यवस्था करण्यास सांगितले होते. हॉटेलच्या कर्मचार्यांनी तिला त्याऐवजी फ्लाइट घेण्याचा सल्ला दिला होता, कारण कॅब महाग असेल, परंतु आरोपीने कॅब घेण्याचा आग्रह धरला.”
जेव्हा गोवा पोलिसांनी कॅब चालकाशी संपर्क साधला आणि आरोपीशी फोनवर बोलून तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा कॉलवर तिने दावा केला की तिचा मुलगा गोव्यातील फातोर्डा येथे मित्रांबरोबर होता. तिची उत्तरे अस्पष्ट आणि संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चालकाला कॅब कर्नाटकातील जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. चित्रदुर्गातील पोलिस स्टेशनमध्ये, कर्नाटक पोलिसांना मुलाचा मृतदेह तिच्या पिशवीत सापडला त्यावेळी तिला ताब्यात घेण्यात आले.
हे ही वाचा<< जेव्हा रस्त्यात गळा चिरून झाला आंतरधर्मीय प्रेमाचा अंत.. २३ वर्षीय अंकितचा हादरवून टाकणारा शेवट, घटनाक्रम वाचा
कोण आहे आरोपी सूचना सेठ?
पोलिसांनी सांगितले की, डेटा सायंटिस्ट सेठ ही ‘द माइंडफुल एआय लॅब’ या टेक कन्सल्टन्सीची संस्थापक आणि सीईओ आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, सेठ एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस एथिक्स एक्सपर्ट असून डेटा सायन्स आणि स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा तिला १२ वर्षांचा अनुभव आहे. प्रोफाइलमध्ये असेही म्हटले आहे की ती AI एथिक्स लिस्टमधील १०० ब्रिलियंट महिलांमधील एक होती आणि बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथील हार्वर्ड विद्यापीठातील बर्कमन क्लेन सेंटरमध्ये फेलो होती.