स्पेनच्या किनारी भागातील सिटगेजमध्ये जवळपास ७० भारतीय खेळाडू सनवे सिटगेज चेस टुर्नामेंटसाठी दाखल झाले आहेत. या स्पर्धेसाठी तिथेच हे खेळाडू वास्तव्यास राहिले असून स्पर्धेच्या आयोजकांनी त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, यातल्या काही खेळाडूंना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातल्याच एका खेळाडूनं एक्सवर (ट्विटर) यासंदर्भात सविस्तर पोस्ट टाकून हा सगळा प्रकार उघड केला आहे. आधी या खेळाडूंचं सामान चोरीला गेलं आणि त्यानंतर आयोजक व पोलिसांकडून या खेळाडूंच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा प्रकार दुश्यंत शर्मा या खेळाडूनं सोशल मीडिया पोस्टमध्ये सविस्तर नमूद केला आहे.
नेमकं काय घडलं?
स्पेनच्या सिटगेजमध्ये दाखल झालेल्या ७० भारतीय खेळाडूंपैकी सहा भारतीय खेळाडूंना या सगळ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता, इंटरनॅशनल मास्टर दुश्यंत शर्मा, वुमन ग्रँडमास्टर श्रिजा सेशाद्री, वुमन इंटरनॅशनल मास्टर मौनिका अक्षया, वुमन इंटरनॅशनल मास्टर अर्पिता मुखर्जी आणि वुमिन फिडे मास्टर विश्वा शाह अशी या सहा खेाडूंची नावं आहेत.एकूण तीन घटनांमध्ये या सहा खेळाडूंच्या सामानाची चोरी झाली. यात लॅपटॉप, एअरपॉड, चांदीचे काही दागिने, साहित्य आणि एका पासपोर्टचाही समावेश आहे.
पहिली चोरी संकल्प गुप्ता व दुश्यंत शर्मा यांच्या खोलीवर १९ डिसेंबर रोजी झाली. तीन दिवसांनंतर इतर दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चोरी झाली. या खोल्यांमध्ये अनुक्रमे मौनिका अक्षया, अर्पिता मुखर्जी व विश्वा शाह राहात होत्या. त्यांचंही सामान चोरीला गेलं. या तिनही खोल्या आयोजकांकडून अधिकृतरीत्या खेळाडूंच्या वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे इतर कोणत्याही देशाच्या खेळाडूने अद्याप चोरीची कोणतीही तक्रार केलेली नाही.
“माझा लॅपटॉप, लॅपटॉप चार्जर आणि एअरपॉड्स चोरीला गेले. माझा रूममेट दुश्यंतचं पासपोर्ट चोरीला गेलं. त्यामुळे त्याला स्पर्धेतून माघार घेऊन भारतात परतण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इथल्या दूतावासात जावं लागलं”, अशी माहिती संकल्प गुप्तानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. संकल्प व दुष्यंत सामने खेळत असताना चोरी झाली तर दुसरी चोरी हे खेळाडू बाहेर फिरण्यासाठी गेले असताना झाली. तिसऱ्या वेळी तर महिला खेळाडू खोलीत झोपलेल्या असताना चोरी झाली.
एकाचं सामान चोरलं, दुसऱ्याचं सोडलं!
दरम्यान, खोलीतून एकाच खेळाडूचं सामान चोरल्याची अजब बाब समोर आली आहे. “हे फार विचित्र आहे. चोरांनी माझे एअरपॉड्स चोरले, पण माझ्या मित्राचे सोडले. माझ्या मित्राचा पासपोर्ट त्यांनी नेला, पण माझा तिथेच सोडला. माझ्या एअरपॉडचं लोकेशन मला अजूनही दिसतंय. पण पोलीस म्हणतात तो बार्सिलोनामधला सर्वात धोकादायक भाग आहे त्यामुळे तिथे जाऊ नका”, असंही संकल्पनं सांगितलं आहे.
आयोजकांनी खेळाडूंवरच केला आरोप
दरम्यान, खेळाडूंच्या वस्तू चोरीला जात असताना आयोजकांनी यासाठी खेळाडूंनाच जबाबदार धरलं आहे. “दरवाजे किंवा खिडक्या बंद करण्यात झालेल्या चुकीमुळे हे हे घडलं असावं”, अशी भूमिका आयोजकांकडून मांडण्यात आली आहे. यासंदर्भात आयोजकांनी एक्सवर निवेदन जारी केलं आहे. मात्र, चोरीच्या पहिल्या घटनेनंतर आम्ही अधिक सतर्क झालो होतो. त्यामुळे दरवाजे, खिडक्या बंद करूनच आम्ही बाहेर फिरायला निघालो होतो, असं मौनिकानं सांगितलं.
“आम्ही जेव्हा आयोजकांना आमच्या चोरीला गेलेल्या सामानाच्या नुकसानभरपाईविषयी विचारलं, तेव्हा त्यांनी आमची चेष्टा केली. ते म्हणाले की तुम्हाला जेवण देऊन त्याची नुकसान भरपाई केली जाईल”, अशी माहिती मौनिकानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.