येमेनमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या ख्रिश्चन धर्मगुरु टॉम उझहन्निल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात यश आले आहे. येमेनमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने टॉम उझहन्निल यांची सुटका करण्यात यश आले असून भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन त्यांच्या सुटकेची माहिती दिली.
ख्रिश्चन मिशनरीतर्फे चालवण्यात येणाऱ्या वृद्धाश्रमात धर्मगुरु टॉम उझहन्निल कार्यरत होते. टॉम उझहन्निल हे केरळचे रहिवासी आहेत. मार्च २०१६ मध्ये येमेनमधील अदेन शहराच्या दक्षिण भागात आयसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यानंतर दहशतवाद्यांनी टॉम उझहन्निल यांचे अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरु होते. यात येमेनसह सौदी अरेबिया आणि ओमान या देशांची मदत घेतली जात होती. अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आले असून दीड वर्षाने त्यांची सुटका करण्यात आली. ‘फादर टॉम यांची सुटका झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे’ अशी माहिती सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन दिली. यानंतर केरळमधील ख्रिस्ती बांधवांनी जल्लोष केला.
धर्मगुरु टॉम उझहन्निल यांना मस्कतमध्ये नेण्यात आले असून आज (मंगळवारी) संध्याकाळी त्यांना विमानाने भारतात आणले जाईल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिली. ओमानच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आल्याचे समजते. येमेनमध्ये हैती बंडखोर आणि सैन्यात संघर्ष सुरु आहे.
#FLASH I am happy to inform that Father Tom Uzhunnalil (Kerala priest) has been rescued: EAM Sushma Swaraj pic.twitter.com/w2RUPS0Zzi
— ANI (@ANI) September 12, 2017