ICG Gujarat ATS Action Against Drugs : भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) व गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात केलेल्या एका संयुक्त कारवाईला मोठं यश मिळालं आहे. १२-१३ एप्रिलच्या रात्री भारतीय तटरक्षक दल व गुजरात एटीएसने समुद्रामार्गे तस्करी केली जात असलेला ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ३०० किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत तब्बल १,८०० कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये मेथामफेटामाइन (Methamphetamine) नावाचं ड्रग्स असल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. आयसीजी व एटीएस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीजीला गुजरात एटीएसकडून या तस्करीविषयी ठोस माहिती मिळाल्यानंतर पश्चिम किनाऱ्यावर देखरेख करण्यासाठी सज्ज असलेलं जहाज घेऊन आयसीजी व गुजरात एटीएसने कारवाई ही केली. अंमली पदार्थांची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी तटरक्षक दलाच्या हातून निसटली असली तरी त्यांनी अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे.
आयसीजीचं जहाज पाहून तस्करांनी अंमली पदार्थांचा साठा समुद्रात फेकून दिला
या बोटीवरील तस्करांनी भारतीय तटरक्षकदलाचं जहाज त्यांच्या जवळ येत असल्याचं पाहिलं आणि त्यांनी त्यांच्याजवळील अंमली पदार्थांचा साठा समुद्रात फेकून दिला. तसेच बोट घेऊन ते सागरी सीमेच्या दिशेने निघाले. त्यांना भारताची सागरी सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करायचा होता. मात्र, तटरक्षक दलाने त्यांची छोटी नाव समुद्रात उतरवली. त्या नावेवरील कर्मचाऱ्यांनी तस्करांनी समुद्राच्या पाण्यात फेकून दिलेले अंमली पदार्थ शोधले आणि जप्त केले. तर आयसीजीच्या जहाजाने तस्करांच्या बोटीचा पाठलाग केला. मात्र, तस्करांची बोट सागरी सीमा पार करून निघून गेली. त्यामुळे तरक्षक दलाला पाठलाग थांबवावा लागला.
आयसीजी व एटीएसची १३ वी यशस्वी कारवाई
दरम्यान, समुद्रात शोधमोहीम हाती घेऊन तस्कारांनी पाण्यात फेकलेले अंमली पदार्थ जप्त केले आहेत. हे अंमली पदार्थ तपासणी करण्यासाठी पोरबंदर येथे आणण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमधील आयसीजी व गुजरात एटीएसची ही १३ वी मोठी व यशस्वी कारवाई आहे. या कारवाईमुळे राष्ट्रीय सुरक्षा व सुरक्षेसाठी तैनात संस्थांमधील मजबूत भागीदारी सिद्ध होत आहे.