Donald Trumps 25 Percent Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक धाडसी आणि वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयांमध्ये अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवरील अतिरिक्त आयात शुल्काचाही समावेश आहे. आता ट्रम्प यांनी परदेशातील ऑटो कंपोनेंट्सवरील आयातीवर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे, ज्याचा परिणाम टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, सोना बीएलडब्ल्यू आणि संवर्धन मदरसन यांसारख्या भारतीय कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे.

या कंपन्या युरोप, जपान, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये ऑटो कंपोनेंट निर्यात करतात, जे अमेरिकेला वाहने पुरवतात. टाटा मोटर्सची अमेरिकेला थेट निर्यात होत नाही, परंतु त्यांची उपकंपनी जग्वार लँड रोव्हरचा अमेरिकन बाजारपेठेत मोठा वाटा आहे. याबाबत मनीकंट्रोलने वृत्त दिले आहे.

जग्वार लँड रोव्हर

जग्वार लँड रोव्हरच्या आर्थिक वर्ष २०२४ च्या अहवालानुसार, त्यांच्या एकूण विक्रीत अमेरिकेचा वाटा २२ टक्के होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, जग्वार लँड रोव्हरने जगभरात सुमारे ४००,००० वाहने विकली होती. यामध्ये अमेरिका अव्वल स्थानी होती, असे अहवालात म्हटले आहे.

कंपनीची अमेरिकेत विकली जाणारी वाहने प्रामुख्याने यूके आणि इतर आंतरराष्ट्रीय प्लांटमध्ये उत्पादित केली जातात, ज्यावर आता २५ टक्के आयात कर आकारला जाणार आहे.

रॉयल एनफील्ड

दरम्यान, रॉयल एनफील्ड मोटारसायकलींची निर्मिती करणारी आयशर मोटर्सवरही डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका रॉयल एनफील्ड ६५० सीसी मॉडेल्ससाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे.

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल

भारतातील आघाडीच्या ऑटो कंपोनंट उत्पादकांपैकी एक असलेल्या, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडचा युरोप आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी मोठा व्यवसाय आहे. ते टेस्ला आणि फोर्डसह प्रमुख अमेरिकन वाहन उत्पादकांना सुटे भाग पुरवतात. पण, अमेरिका आणि युरोपमध्ये उत्पादन प्लँट्स असल्याने इतर कंपन्यांच्या तुलनेत त्यांच्यावर आयात शुल्काचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

सोना कॉमस्टार

सोना कॉमस्टार, ऑटोमोटिव्ह सिस्टीम आणि कंपोनन्ट्सचे उत्पादन करते, ज्यामध्ये डिफरेंशियल गिअर्स आणि स्टार्टर मोटर्सचा समावेश आहे. कंपनीला त्यांच्या उत्पन्नाच्या सुमारे ६६ टक्के हिस्सा अमेरिका आणि युरोपियन बाजारपेठांमधून मिळतो. जोखीम कमी करण्यासाठी, सोना बीएलडब्ल्यू चीन, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये विस्तार करून तिच्या निर्यात स्थळांमध्ये विविधता आणत आहे. या पूर्वेकडील बाजारपेठा पाच वर्षांत कंपनीच्या महसुलात ५० टक्क्यांहून अधिक वाटा देतील, असा दृष्टीकोन कंपनीने ठेवला आहे.

भारताकडून २१.२ अब्ज डॉलर्सची निर्यात

२०२४ च्या आर्थिक वर्षात, भारताने २१.२ अब्ज डॉलर्स किमतीचे ऑटो कंपोनंट निर्यात केले आहेत. जागतिक ऑटो कंपोनंट बाजारपेठेत हे योगदान १.२ ट्रिलियन डॉलर्स इतके आहे. ऑटो पार्ट्सचे जगातील सर्वात मोठे आयातदार अमेरिका आणि युरोपला होणारी शिपमेंट एकूण जागतिक व्यापाराच्या अंदाजे ४.५ टक्के होती.