भारतीय गुप्तचरांची माहिती, पठाणकोट हल्ल्यामागेही हीच शक्यता
अफगाणिस्तानात मझार-ए-शरीफ येथे भारतीय वाणिज्य दूतावासावर केलेला हल्ला हा अफजल गुरू याच्या फाशीचा बदला घेण्यासाठी करण्यात आला होता, असे आता निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यात सामील चार दहशतवाद्यांनी त्यांच्या रक्ताने तसे लिहून ठेवले आहे. अफजल गुरू याला १३ डिसेंबर २००० च्या संसद हल्ला प्रकरणी २०१३ मध्ये फाशी देण्यात आले होते.
किमान २५ तास या दहशतवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासाला वेढा घातला होता, त्यानंतर सोमवारी रात्री त्यांना ठार करण्यात आले. या हल्ल्याच्या वेळी पोलिस इमारतीत शिरल्यानंतर जी छायाचित्रे घेतली आहेत, त्यात भिंतीवर उर्दू भाषेत असे लिहिलेले दिसत आहे, की ‘अफजल गुरू का इंतेकाम, एक शहीद हजार फिदाईन’.
भारतीय गुप्तचरांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, की हल्लेखोरांची ओळख अजून पटलेली नाही, ते कुठल्या दहशतवादी संघटनेचे होते हे समजलेले नाही. अफजल गुरू ज्या संघटनेचा होता त्याच संघटनेने पठाणकोट येथील हल्लाही केलेला आहे. त्यामुळे हे मझार-ए-शरीफ व पठाणकोट हे दोन्ही हल्ले मौलाना मसूद अझर याच्या जैश-ए-महंमद या संघटनेने केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
पठाणकोट हल्ल्याच्या आधी हल्लेखोरांनी ओलिस ठेवलेल्या राजेश वर्मा या गुरुदासपूरच्या सराफी व्यावसायिकाने सांगितले, की अफजल गुरूच्या फाशीचा बदला म्हणून आम्ही कारवाया करीत आहोत, असे हल्लेखोरांनी सांगितलले होते. जैश-ए-महंमद या संघटनेचे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेशी संबंध आहेत. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी पंतप्रधान मोदी यांना दूतावासावरील हल्ल्यानंतर दूरध्वनी केला होता, त्या वेळी मोदी यांनी त्यांना अफगाणिस्तानातील लष्करी मदत थांबवली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. भारताने अलिकडेत अफगाणिस्तानला एमआय २५ हेलिकॉप्टर्स दिली आहेत. २६ जानेवारी २०१४ मध्ये मुजफ्फराबाद येथे गरळ ओकणारा अझर आता पुन्हा कारवाया करू लागला असून त्यानेच अफजल गुरूच्या फाशीचा बदला घेतला आहे. पहिल्यांदा भारताकडे मोर्चा वळवा, अमेरिका व इस्रायलकडे नंतर बघून घेऊ, असे तो बहवालपूर येथे म्हणाला होता. मौलाना मासूद अझर याला भारताने इ.स २००० मध्ये अपहृत विमान प्रवाशांच्या बदल्यात सोडून दिले होते नंतर त्याला जनरल मुशर्रफ यांनी, त्यांनाच मारण्याचा प्रयत्न केल्याने तुरुंगात टाकले होते पण माजी लष्कर प्रमुख परवेझ अशफाक कयानी यांनी त्याचे पुनर्वसन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा