चीन आणि इटलीने त्यांचे खाद्यपदार्थ जगात लोकप्रिय केले हे खरे असले तरी भारतीय खाद्यपदार्थही या शर्यतीत मागे राहिलेले नाहीत, ब्रिटनमध्ये भारतीय ‘करी’ लोकप्रिय झाली आहे. तो ब्रिटनमधील एक मोठा उद्योग बनला असून त्यामुळे आशियातील अनेक कुशल खानसामांना कामही मिळाले आहे, असे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सांगितले. तेथील करी रेस्टॉरंट्सना पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करतानाच त्यांनी या ‘करी’चा समरसून आस्वादही घेतला. त्याचबरोबर इमिग्रेशन र्निबधांमुळे कुशल खानसाम्यांबाबत निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी नियमांत शिथिलता आणण्याचे संकेत दिले.
ब्रिटनमध्ये या आठवडय़ात करी पुरस्कारही प्रदान करण्यात आले, यावेळी कॅमेरून म्हणाले की, भारताच्या ‘करी’ या खाद्यपदार्थाने आमच्या देशात वेगळे योगदान तर दिले आहेच, पण दिवसेंदिवस ती लोकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘करी ऑस्कर ’ कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, तुम्ही देशाला जे दिलेत त्यासाठी आपण मनापासून आभारी आहोत. ‘करी’ हा आता मोठा ब्रिटिश उद्योग म्हणून नावारूपास आला आहे व अजूनही येत्या काही वर्षांत त्याला आणखी यश मिळेल. ‘करी’ हा अस्सल भारतीय पदार्थ असला तरी आता ‘ब्रिटिश करी’ ही सर्वाच्या पोटात सामावली आहे. २००५ मध्ये ब्रिटिश ‘करी’ पुरस्कार सुरू केले तेव्हा अनेकांनी ‘करी’ला ब्रिटिश म्हटल्याने टीका केली होती. असे पुरस्काराचे संस्थापक एनाम अली यांनी सांगितले. त्यानंतर ब्रिटिश लोकांच्या मनातील ‘करी’चे आकलन बदलत गेले. त्याचा दोष हवा तर आपल्याला दिला तरी चालेल, कारण आज टिक्का मसाला या डिशला स्वत:ची ओळख आहे, जगात ती मान्यता पावली आहे, असे ते म्हणाले.
प्रत्येक उद्योगाप्रमाणे या उद्योगातही आव्हाने आहेत व त्याप्रमाणे ‘करी’ उद्योगही बदलत आहे. स्थलांतराचे काही प्रश्न आहेत हे आपल्याला माहिती आहे त्याचा परिणाम या उद्योगावर होतो आहे. पण अनुभवी खानसामा मिळवण्यासाठी आपण वेगळे प्रयत्न करायला तयार आहोत. कुशल आशियायी खानसामा येथे यावेत, त्यांनी पाककला दाखवावी अशीच आमची इच्छा आहे – डेव्हीड कॅमेरून
भारतीय करी करामती!
चीन आणि इटलीने त्यांचे खाद्यपदार्थ जगात लोकप्रिय केले हे खरे असले तरी भारतीय खाद्यपदार्थही या शर्यतीत मागे राहिलेले नाहीत, ब्रिटनमध्ये भारतीय ‘करी’ लोकप्रिय झाली आहे.
First published on: 28-11-2013 at 01:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian curry become popular in britain