कंबोडियामध्ये जवळपास ६५० हून अधिक भारतीय नागरिकांना ‘सायबर स्लेव्ह’ अर्थात एकप्रकारचे गुलाम म्हणून कामास ठेवून फसवणूक करण्यात आली आहे. या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी कंबोडियातील भारतीय दूतावासाने प्रयत्न सुरु केले आहेत. दूतावासाने शनिवारी (२० जुलै) घोषणा करत म्हटले आहे की, या ६५० हून अधिक भारतीय नागरिकांची सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्याचे आमचे ध्येय असून आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहोत. हे सगळे भारतीय नागरिक नोकरीच्या आमिषाला बळी पडून कंबोडियामध्ये आले आहेत. नोकरीच्या आशेने आलेल्या या भारतीयांना फसगत करुन कंबोडियातील सायबर क्राइम ऑपरेशनमध्ये गुंतवण्यात आलं आहे.
हेही वाचा : सायबर गुन्हेगारीत अडकलेल्या ७५ भारतीयांची कंबोडियातून सुटका; ६ महिन्यात ५०० कोटी लुटले
भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न
या कचाट्यातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी नुकतेच भारतीय दूतावासाने कंबोडियन पोलिसांना सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्याबरोबर सहकार्य करत सर्व भारतीयांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे, सध्यातरी १४ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश प्राप्त झाले आहे. सुटका करण्यात आलेल्या या व्यक्ती आता एका कंबोडियन सरकारबरोबर काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या देखरेखीखाली असून तिथे त्यांची काळजी घेतली जात आहे.
भारतीय दूतावासाने काय म्हटले?
भारतीय दूतावासाने नुकतेच जाहीर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, “आम्ही सातत्याने परिस्थितीचा आढाव घेत असून कंबोडियामध्ये फसगत झालेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. कंबोडिया देशातील कोणत्याही नोकरीच्या प्रस्तावाबाबत सावधगिरी बाळगावी; तसेच कसलाही संशय आल्यास आमच्याकडे त्याबाबतची सूचना तातडीने द्यावी, असा सल्ला आम्ही देतो.”
हेही वाचा : यूपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “संविधानिक संस्थांना…”
प्रकरण उघडकीस कसे आले?
कंबोडियन पोलिसांनी सध्या सुटका केलेल्या १४ भारतीय नागरिकांपैकी बहुतांश बिहार आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. केंद्र सरकारच्या एका कर्मचाऱ्याने एफआयआर दाखल केल्यानंतर हा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या कर्मचाऱ्याने गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला एफआयआर दाखल केला होता. या घोटाळ्यात त्याचे ६७ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर कंबोडियामध्ये बसून घोटाळा करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली. नोकरीच्या आमिषाने भारतीयांना कंबोडियामध्ये आणून त्यांच्याकरवी इतर भारतीयांची फसवणूक करणे, असा आरोप या आठ जणांवर होता. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, फसगत झालेल्या भारतीयांना ‘कायदेशीर’ नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांना ‘सायबर स्कॅमिंग’ कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले. या कॉल सेंटर्सकडून भारतातील लोकांना लक्ष्य केले जाते. त्यासाठी फसगत करुन आणलेल्या भारतीयांचाच वापर केला जातो, असा हा घोटाळा आहे. त्यामुळे, सर्वांनी अशा नोकऱ्यांपासून सावध रहावे.