भारत व कॅनडामधील संबंध ताणले जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणाची गेल्या सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा असल्याचं दिसत आहे. खलिस्तान समर्थक दहशतवादी म्हणून भारतीय तपास यंत्रणांनी वाँटेड यादीत समाविष्ट केलेल्या हरदीप सिंग निज्जरची हत्या झाल्यानंतर या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत केला होता. तेव्हापासून या प्रकरणामुळे दोन्ही देशांमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारताचे कॅनडातील उच्चाधिकारी संजय कुमार वर्मा यांनी गंभीर दावा केला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.

हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरण

जून महिन्यात व्हँकोव्हरमध्ये एका पार्किंग स्लॉटमध्ये दोन अज्ञात हल्लेखोरानी हरदीप सिंग निज्जरची गोळ्या घालून हत्या केली. खलिस्तानी समर्थक असलेल्या हरदीप सिंगची हत्या ही दोन्ही देशांमधल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय मिळण्याच्या मुद्द्याला पुन्हा हवा देणारी ठरली. झालंही तसंच. जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपांनंतर भारतानं कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्यांची भारतातून हकालपट्टी केली. दोन्ही देशांमधील संबंधांवर निर्बंध आले. आता भारतातील कॅनडाच्या ४१ अधिकाऱ्यांना भारतानं माघारी पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅनडाला समर्थन मिळत असताना भारतीय उच्चाधिकाऱ्यांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.

कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्यांचा सहभाग – संजय कुमार वर्मा

दरम्यान, संजय कुमार वर्मा यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये कॅनडातील एका उच्चाधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. “मी आता एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणेन की आता या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर मोठा डाग लागला आहे”, असं वर्मा यांनी नमूद केलं. “या प्रकरणात भारताचा किंवा भारतीय अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप करण्याचे निर्देश कॅनडातील उच्चस्तरीय गटातील व्यक्तीकडून आले होते”, असा गंभीर दावा वर्मा यांनी केला आहे.

India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!

“आत्तापर्यंत भारताला असे कोणतेही पुरावे कॅनडा किंवा कॅनडाच्या मित्रांनी पुरवलेले नाहीत, ज्यावरून हे सिद्ध होऊ शकेल की भारतीय अधिकाऱ्याचा या हत्या प्रकरणात सहभाग होता. पण या प्रकरणामुळे दोन्ही देशांमधले संबंध ताणले गेले असले, तरी भारत कॅनडाशी असणारे व्यावसायिक संबंध अधिक विस्तृत करण्यासाठी सकारात्मक असून त्यासाठीच्या तडजोडी करण्यास तयार आहे”, असंही वर्मा यांनी नमूद केलं.

Story img Loader