डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये होत असलेल्या घसरणीमुळे परदेशी शिक्षण, पर्यटन सहली, विदेशातील उपचार या सर्वाना खीळ बसली असताना मालमत्ता बाजारात मात्र, उलटा प्रवाह सुरू आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी जून व जुलै या महिन्यांत परदेशातील मालमत्ता खरेदी करण्यात तसेच भेटवस्तू पाठवण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. रुपयाची आणखी घसरण गृहीत धरून भारतीयांनी गतवर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यांमध्ये पाच पट अधिक डॉलर मालमत्ता खरेदीसाठी खर्च केल्याचे उघड झाले आहे.
रुपयाच्या घसरणीमुळे डॉलर महाग झाला असताना मालमत्ता खरेदी, परदेशात भेटवस्तू पाठवणे अशा गोष्टींवर भारतीयांचे अधिक पैसे खर्च करणे बुचकळय़ात पाडणारे असले तरी बाजार विश्लेषकांच्या मते, भविष्यात रुपयाची आणखी घसरण होण्याची भीती यामागचे कारण असू शकते. ‘रुपयाच्या सततच्या घसरणीने त्याचे भवितव्य काय असेल, याबाबत कमालीची साशंकता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत परदेशात मालमत्ता खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांनी घाईघाईने खरेदी उरकण्याचा प्रयत्न केला असावा,’ असे मत मेरिल लींच वेल्थ मॅनेजमेंटचे प्रमुख अतुल सिंग यांनी म्हटले. तर रुपया आणखी घसरल्यास आपल्याला जादा पैसे मोजावे लागतील, या भीतीने हा कल निर्माण केला असावा, असा अंदाज स्टँडर्ड चॅर्टर्डच्या संपत्ती व्यवस्थापन विभागाचे सरव्यवस्थापक विशाल कपूर यांनी व्यक्त केला.
जून-जुलै २०१२ या कालावधीच्या तुलनेत यावर्षी या दोन महिन्यांमध्ये परदेशात गेलेल्या रुपयाचे प्रमाण मात्र मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. गेल्या वर्षी २१.२७ कोटी डॉलरच्या तुलनेत यंदा २०.२ कोटी डॉलरच्या मूल्याचेरुपये परदेशात पाठवण्यात आले. मात्र, यामध्ये मालमत्ता खरेदीसाठी गुंतवण्यात आलेल्या रुपयाचे प्रमाण लक्षणीय आहे.
गतवर्षी जून-जुलैमध्ये ६७ लाख डॉलरइतका रुपया परदेशात गेला असताना यंदा मात्र तब्बल २ कोटी ९२ लाख डॉलर मालमत्ता खरेदीसाठी पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे परदेशांत पाठवण्यात येणाऱ्या भेटवस्तूंसाठी खर्च होणाऱ्या डॉलरचे प्रमाणही जवळपास ५० लाखाने वाढले आहे. ही बाबत लक्षात आल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने ऑगस्टमध्ये नव्या मालमत्ता खरेदीवर र्निबध आणण्याच्या हालचाली सुरू केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian doing huge shopping in abroad due to rupee fall
Show comments