रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत

जागतिक अर्थव्यवस्थांचा विचार करता भारत हा अंधांच्या भूमीतील एकाक्ष राजा आहे, असे मत रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी ‘मार्केटवॉच’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेत चमकदार बिंदू आहे म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करीत असल्याचा आशावाद नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तीन लगार्ड यांच्यासह अनेकांनी व्यक्त केला असताना राजन यांनी वरील मत व्यक्त केले. भारतीय अर्थव्यवस्थेला इतर देशांमधील आर्थिक पडझडीचे धक्के बसू नयेत यासाठी राजन यांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारत हा जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था बघता एक चमकदार बिंदू आहे, या मताबाबत विचारले असता ते म्हणाले की, जिथे पोहोचल्यावर समाधान वाटले असा टप्पा अजून गाठला गेलेला नाही. अंधांच्या भूमीत एक डोळ्याची व्यक्तीही राजाच असते; आमचे तसेच आहे. रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ असून ते शिकागो विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापकही आहेत. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उन्हाळी बैठकांसाठी ते येथे आले होते. भारताची आर्थिक वाढीची क्षमता आहे व आम्ही योग्य त्या ठिकाणाच्या दिशेने निघालो आहोत, काही गोष्टी झाल्याने आता गुंतवणूक वाढली आहे. स्थूल स्थिरता काही प्रमाणात आली आहे. सर्वच धक्क्य़ांपासून नव्हे तरी जास्तीत जास्त धक्क्य़ांपासून अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतात काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत पण अजून काही उपाययोजना कराव्या लागतील. चलनवाढ ११ टक्क्य़ांवरून ५ टक्के इतकी खाली आली त्यामुळे व्याज दर कमी करता आले. रचनात्मक सुधारणा सुरू आहेत. दिवाळखोरी कायदा आणला जात आहे. वस्तू व सेवा कर विधेयक मंजूर होणे अपेक्षित आहे. दोन बँकांमध्ये मोबाईल टू मोबाईल आर्थिक हस्तांतर व्यवहार गेल्याच आठवडय़ात सुरू केले आहेत. कुणीही त्यात सहभागी होऊ शकते. अ‍ॅपल पे किंवा अँड्रॉइड पे यांच्यासारखा तो मंच कुणाच्या मालकीचा नाही तर ती सार्वजनिक सुविधा आहे व ती जगात आम्ही प्रथम सुरू केली. त्यामुळे तांत्रिक बदल होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

Story img Loader