करोनो काळ, करोना काळातील निर्बंध, टाळेबंदी याचा फटका जगभरात सर्वत्र बसला होता. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला होता. करोनावर लस विकसित झाल्याने, करोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने जगभरातील अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा एकदा सुरु झालं असलं तरी अनेक देश अजूनही धक्क्यातून पुरेसे सावरले नाहीत. असं असतांना भारताची अर्थव्यवस्थेची जोरदार आगेकुच सुरु असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

गुजरातमधील सुरत इथे एका कार्यक्रमात आभासी कार्यक्रमाद्वारे उपस्थित राहत पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यानिमित्ताने भारतीय अर्थव्यवस्थेवर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं. ” स्टार्टअप इंडियाचे यश आपल्या सर्वांसमोर आहे. आज भारतातील स्टार्टअप संपुर्ण जगात नाव कमवत आहेत. करोनाच्या कठीण काळानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेने जेवढ्या वेगाने उभारी घेतली आहे की संपुर्ण जग आशेने भारताकडे बघत आहे. एका जागतिक संस्थेने पण असं म्हंटलं आहे की पुन्हा एकदा भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहे “, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरातचे नवनियुक्त मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे जोरदार कौतुक मोदी यांनी केले. विविध तंत्रज्ञानाची माहिती सुरुवातीपासून असलेले भूपेंद्र हे आजही जमिनीवर आहेत. ते आजही कुठल्या वादात अडकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुजरात आणखी विकास करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

Story img Loader