भारतीय दूतावासामधील कोणत्याही व्यक्तीने खार्कीव्हमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क केलेला नाही, असा दावा या शहरामध्ये मरण पावलेल्या २१ वर्षीय नवीन शेखरप्पा ज्ञानगौडा या भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलाय. मूळचा कर्नाटकातील हावेरी जिल्ह्याचा रहिवासी असणारा नवीन मंगळवारी तोफमाऱ्यात मृत्यूमुखी पडलाय.
नक्की वाचा >> Ukraine War: “तो किराणामालाच्या दुकानासमोर उभा होता, अन् तितक्यात…”; भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूचा घटनाक्रम
नवीन हा काही खाणं आणण्यासाठी आणि चलन बदली करुन घेण्यासाठी बंकर बाहेर पडला होता अशी माहिती त्याचे काका उज्जनगौडा यांनी दिलीय. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यानंतर शेखरप्पा यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर शेखरप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ओळखीच्या लोकांची घरी रांग लागल्याचं चित्र पहायला मिळालं. शेखरप्पा ज्ञानगौडा यांनी, ‘भारतीय दूतावासातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी अडून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संपर्क साधला नाही,’ असा आरोप केलाय. खार्कीव्हमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले असून ते बंकरमध्ये राहत आहेत. नवीन हा खार्कीव्ह वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चौथ्या वर्षाला शिकत होता.
नक्की वाचा >> Ukraine War: “ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांवरुन नाव न घेता पटोलेंचा मोदींना टोला
खार्कीव्हमधील बंकरमध्ये नवीन हा त्याच्यासोबतच्या काही भारतीय विद्यार्थ्यांसोबत मागील काही दिवसांपासून राहत होता. चलन बदली करुन घेण्यासाठी आणि खाणं आणण्यासाठी तो बंकर बाहेर पडला होता. त्याचवेळी हल्ला झाला ज्यात नवीनचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचं त्याच्या काकांनी सांगितलंय.
उज्जनगौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी नवीनने वडिलांना फोन केला तेव्हा बंकरमधील पाणी आणि खाद्य पदार्थ संपल्याची माहिती त्याने दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाने नवीन याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देत विद्यार्थ्यांसह भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेला गती देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन याच्या वडिलांशी संपर्क करून शोक व्यक्त केला.
नक्की पाहा हा व्हिडीओ >> CCTV Video: युक्रेनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरातील मुख्य सरकारी इमारतीवर रशियाने टाकलं क्षेपणास्त्र
युक्रेनच्या खार्कीव्ह आणि अन्य युद्धग्रस्त शहरांतून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याबाबत रशिया आणि युक्रेनच्या दूतावासाबरोबरच उभय देशांतील भारतीय दूतावासांशी संपर्कात आहेत. युद्धग्रस्त भागांतून भारतीयांना सुरक्षित बाहेर पडू देण्याबाबत २४ फेब्रुवारीपासून या दोन्ही देशांकडे वारंवार मागणी करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
नक्की वाचा >> “आमच्याशी भारत सरकारचा संपर्क झाला ही अफवा”; युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यानं सांगितली सत्य परिस्थिती
युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या बिलगोरोड शहरात भारतीय बचाव पथक तैनात करण्यात आले आहे, मात्र खार्कीव्ह आणि शेजारील शहरांतील युद्धस्थिती मदतकार्यात मोठा अडथळा ठरत आह़े खार्कीव्ह शहरात रशिया आणि युक्रेन सैन्यांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. तेथील बिघडती परिस्थिती चिंतेची बाब असून, सर्व भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न
‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे हंगेरी, ज्योतिरादित्य िशदे हे रोमानिया, किरेन रिजीजू हे स्लोव्हाकीया आणि जनरल व्ही़ क़े सिंह यांना पोलंडमध्ये पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने मंगळवारी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या. कीव्ह शहरातून तातडीने बाहेर पडावे, त्यासाठी रेल्वेमार्ग किंवा अन्य उपलब्ध वाहतूक साधनाचा वापर करावा, अशी सूचना दूतावासाने भारतीयांना केली.