सध्या जगभरात गाजत असलेल्या कन्सास गोळीबार प्रकरणात एक नवीन माहिती पुढे आली आहे. अमेरिकेतील कन्सास शहरात गेल्या आठवड्यात श्रीनिवास कुचीभोतला या भारतीय तरूणाची वर्णविद्वेषातून निर्घृण हत्या झाली होती. मात्र, हल्लेखोराला संबंधित भारतीय तरूण इराणी नागरिक वाटल्यामुळे त्याने हल्ला केल्याची माहिती आता समोर येत आहे. हा हल्ला झाला त्यावेळी एका बार टेंडरने पोलिसांशी केलेल्या दूरध्वनी संभाषणाचा तपशील एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या हाती लागला आहे. एक व्यक्ती इराणी नागरिकांना मारल्याची कबुली देत असून लपण्यासाठी जागा शोधत असल्याचे बार टेंडरने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर काहीवेळातच अॅडम पुरिन्टन या हल्लेखोराला बारमधून ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून अशा प्रवृत्तींच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले.
गार्मिन या कंपनीच्या मुख्यालयात जीपीएस निर्माता म्हणून काम करणारा अभियंता श्रीनिवास त्याचा सहकारी आलोक मदासानी याच्याबरोबर ओलेद येथील ऑस्टिन्स बार अॅण्ड ग्रील या बारमध्ये फुटबॉलचा सामना पाहात होते. त्याच बारमध्ये अॅडम पुरिन्टन (५१) हा अमेरिकी नौदलातून निवृत्त झालेला सैनिकही बसला होता. अॅडमने श्रीनिवास आणि आलोक यांच्याशी वाद उकरून काढला. वादादरम्यान त्याने श्रीनिवास आणि आलोक यांना उद्देशून ‘तुम्ही दहशतवादी आहात. माझ्या देशातून चालते व्हा’, असे ओरडून सांगितले. तसेच ‘तुम्ही आमच्या देशात काय करत आहात’, अशी विचारणा करत दोघांवर चाल केली. मात्र बारमधील इतरांनी अॅडमला अडवले. त्यानंतर अॅडम तेथून बाहेर पडला व थोडय़ा वेळाने बंदूक घेऊन पुन्हा बारमध्ये आला. त्याने श्रीनिवास आणि आलोकवर अचानक गोळीबार सुरू केला. त्यात श्रीनिवास आणि आलोक जखमी झाले. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र श्रीनिवासचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद जगभरात उमटले होते. दरम्यान, या घटनेनंतर अमेरिकेतील भारतीय तरुणांना सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेलंगणा अमेरिकन तेलगू असोसिएशनने (टाटा) अमेरिकेतील तेलगू भाषिक तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी तेलगू भाषेत संवाद साधणे टाळावे असे निर्देश जारी केले आहेत.