तुम्ही वर्षभरामध्ये किती सुट्ट्या घेता? आणि सुट्ट्या नाही घेतल्या तर त्या सुट्ट्यांच्या बदल्यात तुम्हाला किती पैसे मिळतात? हिशेब नंतर लावा पण त्याआधी अशाप्रकारे उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात एका व्यक्तीने चक्क १९ कोटी रुपये कमावले आहेत असं तुम्हाला सांगितल्यास विश्वास बसेल का? नाही ना? पण ही बातमी खरी आहे. सुट्ट्यांच्या मोबदल्यात १९ कोटी कमावणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे अनिलकुमार मणीभाई नाईक. विशेष म्हणजे नाईक यांना उद्योग आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील योगदानासाठी यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील अव्वल कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एल अॅण्ड टी कंपनीमध्ये कामाला असणारे नाईक सध्या निवृत्त झाले आहेत. मात्र कंपनीमध्ये अकार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या नाईक यांनी आपल्या ५० वर्षांच्या सेवेमध्ये एकही सुट्टी घेतली नाही. आता हे तुम्हाला खरं वाटणार नाही पण खरोखरच नाईक २०१८ च्या शेवटी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांच्या पेड लिव्हज म्हणजे त्यांनी सुट्ट्यांच्या मोबदल्यामध्ये केलेल्या कामासाठी कंपनीने त्यांना चक्क १९ कोटींचा मोबदला दिल्याचे ‘बिझनेस इनसायडर’ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. नाईक यांचे किमान मासिक वेतन २ कोटी ७३ लाखांहून अधिक होते. याशिवाय इतर अलाऊन्स वगैरेही त्यांना दिले जायचे. इतर भत्ते, कंपनीमधील नफ्यातील वाटा अशी एकूण रक्कम मिळून त्यांचा वार्षिक पगार १३७ कोटी रुपये इतका होता.
१९६५ मध्ये नाईक यांनी इंजिनियर म्हणून एल अॅण्ड टी कंपनीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९८६ साली त्यांना जनरल मॅनेजर पदावर बढती मिळाली. २००३ साली नाईक हे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष होते. निवृत्त होण्याच्या दोन वर्षे आधीच त्यांनी आपल्या एकूण कमाईमधील ७५ टक्के रक्कम आपण समाजसेवेसाठी वापरणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी नाईक चॅरेटेबल ट्रस्टची स्थापना केली असून हे ट्रस्ट गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यविषयक सेवा पुरवण्यासाठी काम करते. नाईक यांना अत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २००९ साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला होता.