प्रिय वाचक,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द इंडियन एक्स्प्रेस’ समुहात असा एकही दिवस गेला नसेल, ज्या दिवशी आम्ही आमच्या समुहाचे संस्थापक श्री. रामनाथ गोएंका यांच्यापासून प्रेरणा घेतली नसेल. त्यांनी त्यांच्या जीवनात जे काही साध्य केले, त्याकडे पाहून आम्ही थक्क होऊन जातो. त्यांची ओळख ‘वृत्तपत्र स्वातंत्र्याचे धाडसी सेनानी’ अशी आहे. परंतु, आज आम्ही त्यांचे स्मरण एक ‘धाडसी व्यावसायिक’ म्हणून करतो आहोत. सत्तरच्या दशकात त्यांनी अत्यंत कमी भांडवलावर देशातील १२ भाषांमध्ये वृत्तपत्रे सुरू केली होती. स्वतंत्र संपादकीय वर्ग आणि अद्ययावत छपाईची सुविधा ही या वृत्तपत्रांची वैशिष्ट्ये होती.

त्या काळात वृत्तपत्रांना मिळणारा ७० टक्के महसूल हा केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळत असे. सत्याचा पाठलाग करताना एक्स्प्रेस समुहाने वारंवार सरकारला झोडपण्याचे काम केले आहे. त्या काळात एक्स्प्रेस समुहाने भव्य विस्ताराची रणनिती आखून आपली वाटचाल केली. वाचकांशी असलेल्या कटिबद्धतेमुळेच १२ पैकी ९ भाषांतील वृत्तपत्रे ही त्या भागातील सर्वात सर्वात मोठी वृत्तपत्रे ठरली.

आज रामनाथ गोएंकांची ११३ वी जयंती आहे. त्यांच्या दूरदृष्टीला आणि वृत्तातील विश्वासार्हता जपण्यासाठी प्राणांतिक प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या वृत्तीला आम्ही नमन करत आहोत. आपल्या देशातील युवा वर्गाच्या आकांक्षांना पूरक ठरेल तसेच त्यांची वैचारिक भूक शमवेल, अशा वेबसाइटचा शुभारंभ आज आम्ही तामिळ भाषेतून करतो आहोत.

रामनाथ गोएंका यांनी सुरू केलेल्या धाडसी पत्रकारितेचा विस्तार देशातील सर्व भाषांमध्ये व्हावा, अशी आशा आम्ही बाळगतो. त्यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेली loksatta.com ही वेबसाइट मराठीतील सर्वात मोठी वेबसाइट आहे. jansatta.com ही हिंदीतील सर्वाधिक वेगाने वाढणारी वेबसाइट आहे, तसेच फेब्रुवारीमध्ये शुभारंभ झालेली ieMalayalam.com ही वेबसाइट त्या भागातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वेबसाइट ठरते आहे.

वाचकांनी भरभरुन दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही भारतातील द्वितीय क्रमांकाचा डिजिटल वृत्त समूह बनलो आहोत. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावरच २०१८ च्या अक्षय्य तृतीयेपूर्वी आम्ही इतर भाषांमध्येही वेबसाइट सुरू करू, असा आम्हाला विश्वास आहे. इंडियन एक्स्प्रेस समुहाशी नव्याने जोडल्या जाणाऱ्या ieMalayalam.com आणि ieTamil.com या दोन्ही भाषांतील वाचकांचे तुम्हीही आमच्यासोबत स्वागत करावे, अशीच आमची इच्छा आहे.

अनंत गोएंका, 

कार्यकारी संचालक, द इंडियन एक्स्प्रेस समूह.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian express launches digital edition in tamil