इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडियाकडून (IEOMSL) पहिल्या ग्रीन टुरीजम इंडिया कॉनक्लेव्ह २०२३ (GTIC2023) ची घोषणा करण्यात आली आहे. पूर्वेकरच्या राज्यांमध्ये जबाबदार पर्यटनाचा प्रसार करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय पर्यटन विभाग, पूर्वेकडील राज्यांचे पर्यटन विभाग व कार्यक्रमाचे प्रेझेंटिंग पार्टनर असणाऱ्या मेघालय राज्याच्या पर्यटन विभागाच्या मदतीने १९ ऑक्टोबर २०२३ रोजी शिलाँगच्या स्टेट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही परिषद पार पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्ग सौंदर्य आणि जैवविविधतेसाठी पूर्वेकडच्या राज्यांची विशेष ओळख आहे. मात्र, पर्यावरण व स्थानिक समाजघटकांबाबत संवेदनशील दृष्टीकोन विकसित करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पर्यटन पद्धतीची आवश्यकता असते. ‘जबाबदार पर्यटन’ हा त्यावरचा मार्ग आहे. त्याचसाठी ग्रीन टुरिजम इंडिया कॉनक्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात चर्चा घडवून आणणं, नवनव्या कल्पना पुढे येणं आणि त्यातून पूर्वेकडच्या राज्यांमध्ये पर्यटनाच्या भवितव्याचा पाया घातला जाणं हा याचा उद्देश आहे.

दिवसभर चालणाऱ्या या कॉनक्लेव्हच्या माध्यमातून केंद्र सरकार व खासगी क्षेत्रातील पर्यटनाशी संबंधित विविध घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यामध्ये टूर ऑपरेटर्स, हॉटेल व्यावसायिक, कम्युनिटी टुरिजम, नवोदित व्यावसायिक अशा सर्वांचा समावेश आहे. पूर्वेकडील राज्य व देशभरातून वैयक्तिक पातळीवर एक व्यक्ती किंवा संस्था म्हणून अनेक व्यक्तींचा गट अशा दोन्ही प्रकारे सदस्य या कॉनक्लेव्हमध्ये सहभागी होतील.

केंद्रीय पर्यटन विभागाने ‘मिशन लाईफ’ अंतर्गत सुरू केलेल्या ‘ट्रॅव्हल फॉर लाईफ’ मोहिमेलाच पूरक अशी ही कॉनक्लेव्ह असेल. पर्यावरण रक्षण व संवर्धनाच्या बाबतीत पर्यटक व पर्यटन व्यावसायिकांच्या वागणुकीत मोठ्या प्रमाणावर बदल घडावा, हा हेतू साध्य करण्यासाठी हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

मेघायल सरकारच्या पर्यटन विभागाचे मंत्री बाह पॉल लिंगडोह हे शिलाँग येथील कॉनक्लेव्हचे प्रमुख अतिथी असतील. त्याशिवाय, मेघालय सरकारच्या पर्यटन विभाहाचे सचिव व आयुक्त डॉ. विजय कुमार डी, मेघालय सरकारच्या पर्यटन विभागाचे संचालक व एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सिरिल व्ही. डी. डियेंगडोह हेही या कॉनक्लेव्हमध्ये उपस्थितांना संबोधित करतील.

या कार्यक्रमात मेघालयातील स्थानिक सांस्कृतिक गट दा थैम्मेई विशेष नृत्याविष्कार सादर करतील. त्याशिवाय, टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ मेघालयचे सरचिटणीस व टूर गाईड्स असोसिएशन ऑफ मेघालयचे सरचिटणीस गेराड्ल सॅम्युअल दुईया ‘मेघालयमधील पर्यटन क्षेत्रासमोरील आव्हाने व संधी’ या विषयावर विशेष सादरीकरण करतील.

या कॉनक्लेव्हमध्ये अनेक चर्चासत्रांचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यापैकी काही विषय पुढीलप्रमाणे…

१. द ग्रेट आऊटडोअर्स: मेघालयमधील साहसी व पर्यावरणपूरक पर्यटनाची वैशिष्ट्ये

२. पूर्वेकडील राज्यांमध्ये कम्युनिटी टुरीजम व होमस्टे: हा प्रकार कसा यशस्वी ठरला?

३. आलिशान सुखसोयीयु्क्त पर्यटन: पूर्वेकडच्या राज्यांसाठी अधिक मोबदल्यात पर्यावरणाची कमी हानी करणारं पर्यटन हेच भविष्य आहे?

४. टुरिजम इन नॉर्थ-इस्ट: संधी, आव्हाने, उपाय व भविष्याची वाटचाल

या हरित पर्यटन परिषद अर्थात ग्रीन टुरिजम इंडिया कॉनक्लेव्हच्या माध्यमातून पूर्वेकडच्या राज्यांमधील पर्यटनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे घटक, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी व देशभरातील तज्ज्ञ वक्ते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे पूर्वेकडील राज्यांमधील पर्यटनाच्या भवितव्याच्या दृष्टीने या कॉनक्लेव्हमध्ये त्या दिशेनं विचारांची सुरुवात व कृतीवर आधारित चर्चा होईल यात शंका नाही.

या कॉनक्लेव्हच्या माध्यमातून शाश्वत विकास व पर्यटनाचं भवितव्य अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक प्रभावी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडिया व फायनान्शियल एक्स्प्रेस डॉट कॉम यांच्यातर्फे केला जात आहे.