बदलती जीवनशैली आणि बदलती आहारपद्धती यामुळे मधुमेही रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात सर्वसाधारणपणे ‘टाइप वन’ आणि ‘टाइप टू’ या प्रकारच्या मधुमेहाचे रुग्ण आढळतात, पण आता अमेरिकेत आढळणारे फ्लॅटबूश मधुमेहाचे रुग्ण भारतातही दिसून येत आहेत. सध्या याचे प्रमाण कमी असले तरी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
फ्लॅटबूश मधुमेहात टाइप वन आणि टाइप टू या दोन्ही प्रकारांतील लक्षणे आढळतात.
या प्रकारांत रुग्णाच्या शरीरात अचानक शर्करा आणि किटोनचे प्रमाण वाढते, पण काही वेळाने हे प्रमाण सामान्यही होते. नवी दिल्लीतील साकेत भागात असलेल्या मॅक्स रुग्णालयात एका रुग्णामध्ये फ्लॅटबूश मधुमेहाची लक्षणे आढळल्यानंतर ‘डायबेटिज केअर’ या वैद्यकीय नियतकालिकात यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतातही मधुमेहाच्या या प्रकारातील रुग्ण आढळत असल्याची माहिती या अहवालात आहे.
या रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, देशातील इतर रुग्णालयांमध्ये या प्रकारातील रुग्ण आढळले की नाही याबाबत माहिती नाही, पण मॅक्स रुग्णालयात सात वर्षांत ३० रुग्णांना फ्लॅटबूश मधुमेह झाल्याचे निदान करण्यात आले. या प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण त्याचे प्रमाण देशभरात वाढू शकते, असे या डॉक्टरांनी सांगितले.
न्यूयॉर्कजवळील ब्रुकलीन शहरातील फ्लॅटबूश परिसरात मधुमेहाच्या या प्रकाराचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे या प्रकाराला फ्लॅटबूश असे नाव देण्यात आले. आफ्रिका खंडातही या प्रकाराचे बरेच रुग्ण आढळतात.

.अन् निदान झाले
मॅक्स रुग्णालयात काही वर्षांपूर्वी एक वाहनचालक दाखल झाला होता. त्याच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण खूपच वाढले होते. त्याची तपासणी केल्यानंतर हे प्रमाण ५०० मिलिग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा अधिक होते. इन्शुलिन दिल्यानंतर काही दिवसांतच त्याची शर्करा सामान्य झाली. पण त्यानंतर काही महिन्यांतच त्याला पुन्हा हा त्रास जाणवला. टाइप वन आणि टाइप टू या प्रकारांत असे आढळत नाही. त्याची तपासणी केल्यानंतर फ्लॅटबूश मधुमेह झाल्याचे निदान झाले.

टाइप वन मधुमेहामध्ये रुग्णाला आयुष्यभर इन्शुलिन द्यावे लागते, तर टाइप टू नियंत्रित करण्यासाठी वजन कमी करावे लागते. सोबत औषधेही घ्यावी लागतात. हे दोन्ही प्रकार दीर्घकाळासाठी असतात. मात्र फ्लॅटबूश हा प्रकार अल्पकाळासाठी असतो. रुग्ण त्यातून पूर्णपणे बरा होऊ शकतो.
डॉ. सुजीत झा, आरोग्यतज्ज्ञ, मॅक्स  रुग्णालय.

Story img Loader