हेक्टरी भातपीकामध्ये चिनी शेतकऱ्याचा अनेक वर्षे अबाधित असलेला १९.४ टनांचा विक्रम बिहारमधील शेतकऱ्याने २२.४ टन भात उत्पादन करून मोडल्यामुळे चीनने आपला पोटशूळ जगजाहीर केला.  बिहारी शेतकऱ्याचा भातपीकाच्या विश्वविक्रमाचा दावा तद्दन खोटा असल्याचे चिनी शास्त्रज्ञाने म्हटले आहे. संकरित भातशेतीचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युआन लाँगपिंग यांनी भारतीय शेतकऱ्याच्या उत्पादनाबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त करून, भारतीय शेतकरी १२० टक्के खोटे बोलत असल्याचा अजब दावा केला आहे.

प्रकरण काय?
ब्रिटनमधील ‘गार्डियन’ वृत्तपत्राने बिहारमधील सुमंत कुमार या शेतकऱ्याची यशोगाथा ‘भारतीय भातक्रांती’ आशयाच्या शीर्षकाखाली नुकतीच प्रसिद्ध केली आहे . त्याने कोणतीही रासायनिक कीटकनाशके न वापरता उत्कृष्ट प्रतीचा आणि तीन-चार पट अधिक भात हेक्टरी उत्पादित केला. बिहारमधील नालंदा जिल्ह्य़ातील दरवेशपूरा या गावातील या शेतकऱ्याला २२.४ टन भात उत्पादन करून भात लागवडीमधील विश्वविक्रम केला आहे, याची कल्पनाही नव्हती. गेल्या वर्षी मुबलक पाऊस आणि कमी सूर्यप्रकाश असल्यामुळे आपले आणि गावातील इतर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले असल्याची त्याला जााणीव होती. मात्र ही यशोगाथा प्रसिद्ध झाल्यानंतर हेक्टरी १९.४ टन उत्पादन घेणारे व संकरित भातशेतीचे पितामह म्हणून ओळखले जाणारे युआन लाँगपिंग यांनी ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ला दिलेल्या  मुलाखतीमध्ये भारतीय शेतकऱ्याच्या दाव्याला खोटे म्हटले आहे.

चिनी दावा काय?
लाँगपिंग यांनी मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, कमी उत्पादन क्षेत्रातही अधिकाधिक पीक घेण्याच्या पद्धती चीनमध्ये मी सुरू केल्या आहेत. त्यामुळे उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ होते, पण ही पद्धत भारतीय लागवड क्षेत्रात राबविली जाणे केवळ अशक्य आहे. पुरेसा पाऊस आणि कमी सूर्यप्रकाश असल्यामुळे आपण मोठे उत्पादन घेऊ शकलो, असा भारतीय शेतकऱ्याचा दावा आहे. मात्र योग्य सूर्यप्रकाश असल्याखेरीज एवढे मोठे उत्पादन घेता येणे कठीण आहे. ‘गार्डियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सुमंत कुमार यांच्या शेतीची छायाचित्रे पाहून लाँगपिंग म्हणाले की, हे पीक विक्रमी होऊ शकत नाही. उत्तम भातपीक हवे असल्यास तितक्याच ताकदीची सुपीक जमीन आवश्यक असते. कुमार यांच्या जमिनीचा दर्जा निकृष्ट असल्याकडे लाँगपिंग यांनी लक्ष वेधले. कुमार यांनी पुढील वर्षी जर सारखेच उत्पादन घेऊन दाखविले, तर मी स्वत: तेथे जाऊन या शेतीची पाहणी करेन, असेही त्यांनी म्हटले.

Story img Loader