मध्य रेल्वेच्या प्रशासकीय कामकाजासाठी तयार करण्यात आलेल्या मायक्रोसाईटचे एक वेबपेज दहशतवादी संघटना ‘अल कायदा’ने हॅक केल्याचे मंगळवारी दिसून आले. केंद्र सरकारच्या अखत्यारितील (डोमेन) वेबसाईटच हॅक झाल्यामुळे सरकारचे इंटरनेट कवच तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळमधील प्रशासकीय कामासाठी तयार करण्यात आलेले वेबपेज अल कायदाच्या हॅकर्सकडून हॅक करण्यात आले. या पेजवर “Message to Muslim People in India from AQIS (sic).” असा मजकूर एका छायाचित्रासह प्रसिद्ध करण्यात आला आहे. तेथील लिंकवर क्लिक केल्यानंतर दक्षिण आशियातील अल कायदाचा म्होरक्या मौलाना असीम उमर याने दिलेल्या संदेशावर वाचकाला घेऊन जाण्यात येते. भारतातील मुस्लिमांनी जागतिक जिहादामध्ये सक्रिय व्हावे आणि अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांचा बिमोड करावा, असे या संदेशात म्हटले आहे.
मौलाना असीम उमर उत्तर प्रदेशमधील संभळचा राहणारा असून, गेल्यावर्षी त्याची दक्षिण आशियातील अल कायदाचा म्होरक्या म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Story img Loader