भारतातील काही रुग्णालयांनी रशियन बनावटीची करोना लस स्पुटनिक व्हीची मागणी रद्द केली आहे. देशात या रशियन लसीची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून लक्षणीयरित्या कमी झाली आहे. स्पुटनिक व्ही कोल्ड स्टोअरमध्ये ठेवण्याचे आव्हान असल्याचे सांगत रुग्णालयांनी लसीची मागणी रद्द केली आहे. सरकारकडून बहुतांश लोकांना लस मोफत उपलब्ध आहे त्यामुळे या लसींची विक्री होण्यात मोठी अडचण निर्माण झाल्याचे काही रुग्णालयांनी म्हटले आहे. किमान तीन प्रमुख रुग्णालयांनी स्पुटनिक व्हीची मागणी रद्द केली आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी जितेंद्र ओसवाल म्हणाले,” स्टोरेज आणि त्यासंदर्भातील इतर काही कारणांमुळे, आम्ही आमची २,५०० डोसची ऑर्डर रद्द केली आहे. या लसीला मागणी देखील मोठी नाही. जेमतेम १ टक्के लोकांना स्पुटनिक लसीसाठी विचारत.”
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मे ते गेल्या आठवड्यापर्यंत, खाजगी रुग्णालयांनी भारतात आलेल्या स्पुटनिक लसींपैकी फक्त सहा टक्के लसींचा वापर करण्यात आला आहे. सरकारने खाजगी रुग्णालयांसाठी भारतात उत्पादन करण्यात आलेल्या लसींपैकी एक चतुर्थांश लसींच्या खरेदीसाठी मान्यता दिली आहे.
दरवर्षी सुमारे ८५९० दशलक्ष लसींची नियोजित क्षमता असलेले भारत हे स्पुटनिक व्हीसाठी एक प्रमुख उत्पादन केंद्र आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लि.ने जूनमध्ये उत्पादन करण्यास सुरुवात केल्यापासून, स्पुटनिक व्हीचे केवळ ९,४३,०० डोस रुग्णालयांनी वापरले आहेत. डॉ.रेड्डी यांनी मात्र याबद्दल बोलण्यास नकार दिला.
भारताच्या लसीकरण मोहिमेचा मुख्य आधार अॅस्ट्राझेनेकाची कोव्हिशिल्ड लस आहे जी नियमितपणे रेफ्रिजरेटरमध्ये साठवली जाऊ शकते. स्पुटनिक व्हीच्या वापरासाठी १८ डिग्री सेल्सियस तापमान आवश्यक असते, ज्याची भारतातील बहुतेक भागात हमी देणे अशक्य आहे. खाजगी बाजारात ही लस अॅस्ट्राझेनेकापेक्षा ४७ टक्के अधिक महाग आहे.
हैदराबाद शहरामध्ये आठ लसीकरण केंद्रे चालवणाऱ्या एविस हॉस्पिटलने १०,००० स्पुटनिक व्ही डोसचा मागणी रद्द केली आहेत. या व्यतिरिक्त, पुण्याच्या आणखी एका रुग्णालयाने स्पुटनिक व्ही ऑर्डर रद्द केली आहे. भारतातील ८८ टक्के लसीकरण कोव्हिशिल्डद्वारे झाले आहे. त्यानंतर भारत बायोटेकने विकसित केलेली कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड सरकारी केंद्रांवर जानेवारीच्या मध्यापासून मोफत देण्यात येत आहे.