भ्रष्टाचार विरोधी चळवळीचे प्रमुख अण्णा हजारे, बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन यांनी अमेरिकेतील भारत दिनाच्या संचलनात भाग घेतला, यावेळी सुमारे दोन लाख लोकांनी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा फडकावला. अण्णा हजारे व विद्या बालन यांना उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला. भारताच्या बहुरंगी संस्कृतीचे दर्शन यावेळी घडले. न्यूयॉर्क शहरातील हे तेहतिसावे भारत दिन संचलन होते.
संचलनाच्या वेळी मॅनहटन येथील मॅडिसन अ‍ॅव्हेन्यू येथे हजारे व बालन यांच्या स्वागतासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. अण्णा हजारे झिंदाबादच्या घोषणांनी सारा आसमंत दुमदुमला. विद्या बालन व अण्णा हजारे यांनी दोन लाख भारतीय-अमेरिकी लोकांना संचलनाच्यावेळी अभिवादन केले. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स या संस्थेच्या वतीने हे संचलन आयोजित करण्यात आले होते. हजारे यांना उपस्थित लोकांकडून उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला, अनेक ठिकाणी त्यांनी गाडी थांबवून लोकांशी हस्तांदोलन केले. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात भारतीय-अमेरिकी लोक तुमच्या सोबत आहेत असे या लोकांनी मोठय़ाने ओरडून सूचित केले.
विद्या बालन हिने सांगितले की, असे सुंदर व मनापासून केलेले स्वागत कधी अनुभवले नव्हते. संचलनातील अनेकांनी तिरंगी रंगाचा पोशाख व गांधी टोपी परिधान केली होती. आय अ‍ॅम फॉर अण्णा असे टोप्यांवर लिहिले होते. अमेरिकेतील या संचलनाच्या वेळी अनेक लोक केवळ अण्णांना पाहण्याच्या उत्सुकतेने आले होते. महात्मा गांधींनी दिलेल्या अिहसेच्या शिकवणीच्या आधारे अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले आहे.
गर्दीचे नियंत्रण करताना न्यूयॉर्क पोलिसांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला, विद्या बालन हिनेही मॅडिसन अ‍ॅव्हेन्यू येथे जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केले. एफआयए फ्लोटवर बसून ती एफआयए अध्यक्ष संजय अमीन, न्यूयॉर्कमधील कौन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळे, माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांच्यासमवेत ती आली होती. विद्याने तिच्या चाहत्यांना ‘फ्लाइंग कीस’ ही दिला. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. त्यात लाल किल्ल्याची ८० बाय १० फुटांची प्रतिकृतीही ठेवण्यात आली होती. दाक्षिणात्य अभिनेते आर. सरतकुमार, राधिका सरतकुमार, जयश्री चंद्रशेखर हे यावेळी तामिळ फ्लोटवर उपस्थित होते.

Story img Loader